नाशिकच्या गिर्यारोहकांनी सर केला 'हडबीची शेंडी' सुळका; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील मनमाड (Manmad) जवळ असलेल्या सातमाळ पर्वत रांगेतील (Satmala Parvat Ranga) अंकाई-टंकाई (Ankai-Tankai fort), गोरक्षगड (Gorakshagad) तसेच कातरा किल्ला (Katara Killa) यांच्या समोरील बाजूस हाडबीची शेंडी (Hadbichi shendi) हा सुळका दिमाखात उभा आहे....

हा सुळका अंगठ्याच्या प्रतिकृतीसारखा (Thumbs Up) असल्यामुळे याला अंगठ्याचा डोंगर सुद्धा म्हंटले जाते. अतिशय अवघड असा हा सुळका नाशिकच्या गिरिभ्रमण आणि गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांनी (Vaintey trekkers) सर केला. बुधवार (दि. १०) रोजीच्या शिवप्रताप दिनी (Shivpratap Din) ही कामगिरी केली.

या सुळक्याची उंची १२० फूट असून गिर्यारोहणाच्या श्रेणीनुसार या सुळक्याचे आरोहण मध्यम ते कठीण प्रकारात मोडते. सुळका तीन टप्प्यात सर करावा लागतो. त्यात पहिला आणि दुसरा टप्पा मध्यम आणि शेवटचा टप्पा अवघड श्रेणीत मोडतो.

सुळक्या वरील प्रस्तर खूपच सैल असल्यामुळे चढाई जिकरीची आणि आव्हानात्मक होती. सुळका सर करण्यासाठी प्रथम आरोहक गौरव जाधव याने सुरुवात केली. त्यापाठोपाठ रोहित हिवाळे याने प्रथम आरोहकास बीले दिले.

सुळका सर करण्यासाठी चोक नट तसेच जुन्या प्रसारणात्मक खिळ्यांचा वापर केला. त्यानंतर विद्या अहिरे आणि पृथ्वीराज शिंदे यांनी आरोहण करून सुळक्याचा माथा गाठला.

पृथ्वीराज शिंदे यांनी ड्रोन च्या सहाय्याने आजूबाजूचे आणि सुळक्याचे चित्रीकरण केले. सुळक्यावरून उतरताना तेथे असलेल्या मेखेचा आणि खडकाचा आधार घेऊन रॅपलिंग करून चारही गिर्यारोहक माथ्यावरुन खाली उतरले.

सकाळी आठ वाजता सुरू झालेली मोहीम संध्याकाळी चार वाजता संपूर्ण यशस्वी झाली. वैनतेय संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे या मोहिमेला मार्गदर्शन लाभले. मोहिमेबाबतची माहिती गिर्यारोहक आणि गडकिल्ले अभ्यासक सुदर्शन कुलथे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

या गिर्यारोहकांचा होता सहभाग

गौरव जाधव (लीड क्लाइम्बर), रोहित हिवाळे, विद्या अहिरे (सेकंड मॅन), पृथ्वीराज शिंदे ( ड्रोन फोटोग्राफी / थर्ड मॅन ) या गिर्यारोहकांनी ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com