म्हाळसाकोरेत व्हॉट्सअपद्वारे लसीकरणाचे नियोजन

ग्रामस्थांच्या गर्दीला फाटा; आरोग्य अधिकाऱ्यांचे कौतुक
म्हाळसाकोरेत व्हॉट्सअपद्वारे लसीकरणाचे नियोजन

म्हाळसाकोरे । Mhalsakore

सर्वत्र कोविड लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांना वेळेत लस मिळत नाही. तासनतास रांगेत उभे राहून शेवटी लस न घेताच घरी परतावे लागते. काही ठिकाणी गावातील राजकारण आडवे येते.

बऱ्याच लसीकरण केंद्रांच्या वारंवार तक्रारी येतात. याला मात्र निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे आरोग्य केंद्र अपवाद आहे. आरोग्याधिकारी प्रियंका पवार आणि सानप यांच्या नियोजनामुळे म्हाळसाकोरे आरोग्य अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना योग्य आणि वेळेत लस मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

म्हाळसाकोरे आरोग्य केंद्रात ज्या दिवशी लस उपलब्ध होणार आहे, त्या दिवसाच्या एक दिवस अगोदर किती लशी उपलब्ध होणार आणि पहिला डोस झालेल्या अमुक एका तारखेला लस घेतलेल्या नागरिकांनी सकाळी उपस्थित राहावे, असा व्हॉट्सअॅप मेसेज आशा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाठविला जातो. तो मेसेज संबंधित कर्मचारी कार्यक्षेत्रातील गावांच्या इतर ग्रुपवर पाठवतात.

दुसऱ्या दिवशी ज्या तारखेचे नागरिक बोलवले आहेत, तेच जातात इतर जात नसल्याने गर्दी होत नाही. लसीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एक नंबरपासून टोकन दिले जाते. टोकन घेतलेल्या क्रमाने नागरिक एका रांगेत उभे राहतात. वयस्कर नागरिकांना टोकन देऊन सावलीत बसविले जाते.

नंबर आला की इतर कर्मचारी त्यांना हात धरून घेऊन जातात.कर्मचारी सहकार्य करतात. त्यामुळे कोणताही गोंधळ होत नाही. एक आदर्श लसीकरण सुरू असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.नागरिक गोंधळ करत नसल्याने कर्मचारीसुद्ध आनंदाने काम करत आहेत.

सर्वांना वेळेत आणि खबरदारी घेऊन लस मिळाली पाहिजे असा आमचा मुख्य हेतू आहे . सोशल मीडियातून तारीख कळवली जाते.उपस्थितांना टोकन पद्धतीने लस दिल्यामुळे गर्दी होत नाही . नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे .

- प्रियंका पवार , आरोग्याधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com