जिल्ह्यात लसीकरण केंद्रांना मिळणार बंदोबस्त

उपजिल्हाधिकार्‍यांचे पोलीस प्रशासनाला पत्र
जिल्ह्यात लसीकरण केंद्रांना मिळणार बंदोबस्त

नाशिक | Nashik

शहर तसेच जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असून लसीच्या तुटवड्यामुळे नागरीकांमध्ये नाराजगी आहे.

यामुळे अनेक केंद्रांवर वादाचे प्रसंग घडत असून सर्व लसीकरण केंद्रांना पोलीस बंदोबस्त पुरवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधिक्षकांना केली आहे. त्यानुसार लवकरच त्या त्या पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लसीकरण केंद्रांना देण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

लवकरात लवकर लस घेऊन स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करावे यासाठी लोक आग्रही असताना लसींचा मात्र तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे.

यातून अनुचित प्रकार घडू नये व लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत राबविता यावी याकरीता पोलिस बंदोबस्त पुरवा असे विनंती पत्र लसीकरणाचे घटना व्यवस्थापक व उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी पोलीसांना दिले आहे.

लसीचा साठा अपुरा असल्याने राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले आहे. ४५ हुन अधिक वय असलेल्या व्यक्तींनाच प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा आणि दुसर्‍या डोसचे देय लाभार्थी पूर्ण झाल्यास ४५ च्या पुढील वयोगटातील लाभार्थ्यांना पहिला डोस देण्याचे निर्देश लसीकरण केंद्रांना देण्यात आले आहेत.

याशिवाय कोव्हीशिल्ड लस देखील आता सहा ते आठ आठवड्यांऐवजी १२ ते १६ आठवड्याने देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या सुचनांमुळे लाभार्थ्यांत गोंधळ निर्माण झाला असून लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांची मोठी गर्दी होते आहे. यातुन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ग्रामीण भागातील संबंधित तालुक्यातील पोलीस प्रशासन व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समनव्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांसारख्या लसीकरण केंद्रांवर गर्दीचे व्यवस्थापण करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे असे विनंती पत्र पोलीसांना देण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच त्या त्या पोलीस ठाण्या अंतर्गत पोलीस बंदोबस्त देण्याची व्यवस्था करण्यात अल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com