दिंडोरीत आजपासून महालसीकरण अभियान

दिंडोरीत आजपासून महालसीकरण अभियान

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी Dindori शहरात आज (दि.13) पासून रोज सलग 12 तास महालसीकरण अभियान vaccination Campaign राबवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली. या अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. सुभाष मांडगे Dr Subhash Mandge यांच्यासह तालुका आरोग्य विभागाने केले आहे.

सध्या करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आसपासच्या तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळल्याने आपल्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. सध्या करोनाचा फैलाव दिंडोरी तालुक्यात आटोक्यात असला तरी अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेला करोना संसर्गापासून दूर ठेवून बचाव करता यावा व जनतेची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘कवच कुंडल’ अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे.

दिंडोरी शहरातील अरुणोदय सार्वजनिक वाचनालय, श्री ईशान्येश्वर अभ्यासिकेत उद्या (दि. 13) पासून महालसीकरण शिबिर होणार आहे. या शिबिरात लसीकरण तत्काळ करण्यात येईल. त्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड आणावे. आरोग्य कर्मचार्‍यांकडून नोंदणी करून घ्यावी.लसीकरणासाठी वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार आहे.

जे लाभार्थी महिला, पुरुष किंवा युवक यांना नोकरी, घरकाम, मजुरी यामुळे वेळ मिळत नाही त्यांना संध्याकाळीही लसीकरण करता येईल. त्यासाठी पाच टेबलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून लवकरात लवकर लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. गरोदर मातांनाही लस घेता येईल. कुणाला आजार असल्यास त्याबाबत वैद्यकीय सल्ल्याने लस देण्यात येईल. कोविशिल्ड लस आणि कोव्हॅक्सिन लस दोन्ही ठेवण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत लाभ घेता येईल.

या उपक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी सहभागी होणार असून वंचित लाभार्थ्यांपर्यंत शासनाचा लसीकरणाचा उपक्रम पोहोचणार आहे. यासाठी प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, नगरपंचायतीचे प्रशासक पंकज पवार, मुख्याधिकारी डॉ. नागेश येवले, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांचेही सहकार्य लाभणार आहे. तरी सर्व शहरातील व तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने लसीकरण करून घ्यावे व आपले आरोग्य अबाधित ठेवावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.