पशुधनासाठी लसीकरण मोहीम

पाळीव पशुंना लसीकरण करून घ्यावे - जि.प.सभापती संजय बनकर
पशुधनासाठी लसीकरण मोहीम

नाशिक । दि.२ प्रतिनिधी

जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ खुरकुत रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते.

त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले आहे.पशुपालकांनी या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या पाळीव पशूंना लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले आहे.

जिल्हयामध्ये एकूण २१ लाख ७५ हजार ०४४ इतके पशुधन असून त्यापैकी गाय व म्हैस वर्ग पशुधन १२ लाख ३७ हजार ३१३ पशुधन संख्या आहे. यामध्ये गाय व म्हैस वर्गातील या सर्व पशुधनास लसीकरण सुरू करण्यात आले आहे.१५ ऑक्टोबरपर्यंत लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.

ही लसीकरण मोहीम वरील कालावधीत एकाच वेळी आपल्या जिल्ह्यात व संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. या लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक एकूण १० लाख २५ हजार लस मात्रा जिल्हयास प्राप्त झालेली आहे.

या लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक साधन सामुग्री जसे सिरींज, निडल्स आदीचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखाना स्तरावर करण्यात आलेला आहे.

या रोगाचे आर्थिक महत्व लक्षात घेऊन याबाबत संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लसीकरण करुन सन 2030 पर्यंन्त लाळ खुरकुत रोगाचे पूर्ण नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे. या रोगामुळे पशूधनाच्या उत्पादन क्षमतेमध्ये घट होऊन दूध उत्पादन मोठया प्रमाणात कमी होते.

तसेच वांझपणा अशक्तपणामुळे शारीरिकदृष्टया पशुधन कमकुवत होत असते. या रोगाची लागण देशात होत असल्याकारणाने मोठया प्रमाणात मांस निर्यातीला फटका बसत आहे. हा रोग पूर्णत: नियंत्रणात आल्यास मोठया प्रमाणात मांसाची निर्यात परदेशात होऊन परदेशी चलन देशास उपलब्ध होऊ शकते.

या रोगाचे महत्व लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व पशुपालकांनी आपल्या बहुमूल्य पशुधनास लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक हे लसीकरण करून घ्यावे व त्यासाठी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखन्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती संजय बनकर, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. नरवाडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com