विद्यार्थ्यानो ! परीक्षा शुल्क मिळणार नाही !

छपाई, प्रश्नपत्रिकांसाठी खर्च मार्गी
विद्यार्थ्यानो ! परीक्षा शुल्क मिळणार नाही !

नाशिक | Nashik

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने नाशिक विभागातील २ लाख विद्यार्थ्यांचे ८ काेटी रुपये परीक्षा शुल्क व राज्यातील एकूण १६ लाख विद्यार्थ्यांकडून घेतलेले जवळपास ७० काेटी रुपयांचे परीक्षा शुल्क चार ते पाच महिन्यांपूर्वीच छपाई आणि इतर शैक्षणिक कामासाठी वापरले गेले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, पालकांकडून सुरु असलेल्या शुल्क परत मिळण्याच्या मागणीला ठेंगा मिळण्याची दाट शक्यता आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली. ही परीक्षा होणार म्हणून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क म्हणून घेतलेली तब्बल ७० कोटी रुपयांहुन अधिक रक्कम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खात्यात जमा हाेती. परीक्षा होणार नसल्याने राज्य मंडळ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करणार ? परीक्षा शुल्काचा उपयोग नेमका कसा होणार!, असे असंख्य प्रश्न आता उपस्थित केले जात हाेते.

आता परीक्षाच होणार नसल्याने राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी पालकांकडून आणि विविध संघटनांकडून होत आहे. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यांकन होणार आहे. त्यासाठी सध्या निकष ठरविले जात आहेत. परंतु बोर्डाची परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचा छपाई खर्च, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, पर्यवेक्षकांचे मानधन, भरारी पथकाचा खर्च, असा खर्च बोर्डाला करावा लागतो. परंतु यंदा खर्च बोर्डाला करावा लागलेला नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क विद्याथ्यांना परत मिळावे, अशा मागणीने जोर धरला आहे.

तर दुसरीकडे या परीक्षेचे नियोजन हे सहा महिन्यापासून सुरू असते. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी त्यासाठीचा बोर्डाचा खर्च झाला आहे. परीक्षा रद्द केल्याने परीक्षा केंद्रावर होणारा खर्च झालेला नाही. त्या व्यतीरिक्त परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका काढणे, त्याची छपाई, उत्तरपत्रिकांची छपाई असा जवळपास खर्च झाला आहे. त्यामुळे परीक्षा नाही, म्हणून खर्चही नाही, असे म्हणणे संयुक्तिक राहणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

म्हणजेच हे परीक्षा शुल्क उत्तरपत्रिका, छपाई, प्रश्नपत्रिकांसाठी वापरले गेले असून ते विद्यार्थ्यांना परत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com