
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
कैद्यांच्या हालचालीवर, त्यांच्या गैरप्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाने ड्रोनची मदत घेतली आहे. कारागृहाच्या आत व बाहेर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यास सुरुवात झाल्याने कारागृहाची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. कैद्यांमधील मारामारीसह, संशयास्पद हालचाली व कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यास ड्रोनची मदत होणार आहे. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनच्या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. उत्तर प्रदेशने सर्वात प्रथम ड्रोनचा वापर सुरु केला. त्यानंतर महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्य सरकारने ड्रोनसाठी काही कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या ड्रोनमध्ये आधुनिक कॅमेरे आहेत. दिवसा आणि रात्रीही ड्रोन फेरी मारून हालचाली टिपू शकते. सुरुवातीला महाराष्ट्रातील आठ मध्यवर्ती, दोन जिल्हा कारागृहे आणि दोन खुल्या कारागृहात ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. येरवडा, कोल्हापूर, नाशिकरोड, संभाजीनगर, नवी मुंबईतील तळोजा, ठाणे, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, कल्याण या कारागृहांमध्ये ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. नाशिकरोड कारागृहातील सहा कर्मचार्यांसह राज्यातील वरील कारागृहांच्या कर्मचार्यांनी पुणे येथे ड्रोनचे प्रशिक्षण घेतले आहे.
ब्रिटिशांनी 1927 साली स्थापन केलेल्या, शंभर एकरवर पसरलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सध्या तीन हजारावर कैदी आहेत. देशातील कारागृहांमध्ये बेकायदेशीर तसेच गुन्हेगारी कृत्ये वाढली आहेत. खतरनाक कैदी दुसर्या कैद्यांचा बळी घेण्यासही कचरत नाही. कारागृहात असलेले गुन्हेगारी टोळ्यांचे भाई, राजकीय हस्ती कारागृहातून खंडणी गोळा करत असल्याचे व खुनाच्या सुपार्या देत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. कारागृहातील काही अधिकारी, कर्मचार्यांची मदत ते घेत आहेत. त्यांच्यावरही ड्रोनमधून लक्ष ठेवले जाणार आहे.
कारागृहांमध्ये कैदी संख्या वाढली आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे. ड्रोनची मदत घेतल्याने मनुष्यबळाचा प्रश्न निकाली लागणार आहे. नाशिकरोड कारागृहाभोवती ब्रिटीश काळात उंच भिंत उभारली आहे. तिची उंची सोळा फूट आहे. गस्तीसाठी मनोरे आहेत. ही सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने या उंच भोवती चोहोबाजूंनी आठ फूट उंचीची नवी भिंत उभारण्यास सुरुवात केल्याने कारागृहाची सुरक्षा अधिक मजबूत होणार असल्याची माहिती अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.