युरिया उपलब्ध करून द्यावा - खा.डॉ.भारती पवार
नाशिक

युरिया उपलब्ध करून द्यावा - खा.डॉ.भारती पवार

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांकडे मागणी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खरीप हंगाम सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. मात्र, युरीया खत मिळत नाही.त्यामुळे युरिया खताचा साठा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी खा.भारती पवार यांनी केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे केली.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या विषयी वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यात मका खरेदी संदर्भात, कांदा निर्यात, कापूस खरेदी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक कर्ज संदर्भातील येणाऱ्या अडचणी, त्यांना शेतीसाठी मिळणारे रासायनिक खते, पी.एम.किसान सन्मान निधी योजना अशा अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला.

या चर्चेत खा.डॉ.भारती पवारांनी शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याची तक्रार केली.तेव्हा कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यसरकारला अगोदरच रासायनिक खतांची पूर्तता केली असून राज्य सरकारने योग्य व्यवस्थापन करून शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहेत. त्यात ५ लाख कोटी रुपये हे कृषी साठी आणि कृषी क्षेत्रातील सुविधांसाठी दिले आहेत. केंद्र सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असेही कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी बैठकी प्रसंगी सांगितले.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनिल बोंडे, कृषी आयोगाचे पाशा पटेल, शेतकरी तथा भाजप नेते सदाभाऊ खोत यांच्यासमवेत खा.डॉ.भारती पवारांसह राज्यातील अनेक भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com