नाशिक | Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन २०२१ मध्ये होणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी ॲण्ड नेव्हल अकॅडमी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात मुंबई व नागपूर केंद्रावर येत्या १८ एप्रिलला परीक्षा पार पडणार आहे.

तर, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येत्या १९ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज मागे घेण्यासाठी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंतची संधी मिळणार आहे.

पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात 'एनडीए'मध्ये इयत्ता बारावीनंतर बी. टेक. या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सैन्य दल अधिकारी, तर केरळ येथील नेव्हल अकॅडमीमध्येही पदवी शिक्षणासोबत नौदलातील अधिकारी होण्याची संधी असते.

यंदा 'एनडीए'मध्ये ३७० जागांसाठी प्रवेश दिला जाणार असून, त्यामध्ये आर्मी-२०८, नेव्ही- ४२ आणि एअरफोर्स-१२० चा समावेश आहे. नेव्हल अकॅडमी येथे चारशे जागांसाठी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे.

येत्या १८ एप्रिलला महाराष्ट्रात मुंबई, नागपूर या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी केवळ पुरुष उमेदवारांना संधी मिळणार असून, २ जुलै २००२ नंतर व १ जुलै २००५ पूर्वी जन्मलेले उमेदवार या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र असतील.

आर्मीकरिता शिक्षणाची अट बारावी उत्तीर्ण आहे, तर वायुदल किंवा नेव्हल शाखांसाठी इयत्ता बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांतून उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

परीक्षेचे स्वरूप

'एनडीए' तसेच नेव्हल अकॅडमीसाठी नऊशे गुणांचे दोन पेपर होणार आहेत.

गणित विषयाचा पेपर तीनशे गुणांसाठी, तर सामान्य आकलनक्षमतेवर आधारित सहाशे गुणांच्या पेपरचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अडीच तासांचा वेळ मिळणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे.