
पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
निफाड तालुक्यात गुरुवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात काढणी करून ठेवलेल्या कांद्याचे (Onion) नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे...
गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. निफाड तालुक्यातील रौळस, पिंपरी, पिंपळगाव बसवंत, कारसूळ, शिरवाडे वणी परिसरात पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे शेतात काढणी करून ठेवलेला कांदा व अंतिम टप्प्यात असलेल्या द्राक्षबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच अल्प दर आणि त्यात अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्णतः मेटाकुटीला आला आहे. बेदाणा व्यावसायिकांचेदेखील नुकसान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे असल्याने वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली होती.