
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने विजेच्या गडगडाटासह हजेरी लावली. अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
अवकाळी पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला मात्र बळीराजा हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊन द्राक्ष, कांदा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्र्यंबक, मनमाड आणि सिन्नरला पावसाने झोडपले आहे. पावसामुळे शेतात पाणी तुंबले आहे. द्राक्षाचे दर अगोदरच काही प्रमाणात कोसळले आहे. त्यात आता अवकाळीने झोडपल्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघतो की नाही? अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आली आहे.
दरम्यान, राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, जळगाव, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देवळाली कॅम्पला पावसामुळे एक झाड रस्त्यात कोसळले. काहीकाळ वाहतूक कोळंबली होती. माहिती मिळताच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक शिवराज चव्हाण यांच्यासह विनोद खरालिया, धीरज डुलगजसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.