महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना असमाधानकारक

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) संघटनेचे यूजीसीला पत्र
महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना असमाधानकारक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना समाधानकारक नसून त्याबाबत योग्य ते स्पष्टीकरण द्यावे, यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ने यूजीसीला पत्र लिहिले आहे.

करोना प्रादुर्भावामुळे राज्यात अंतिम टर्म/अंतिम सेमिस्टर परीक्षा घेण्यास राज्य शासन व उच्च शिक्षण विभागाने असमर्थता व्यक्त केली. यूजीसीसह अन्य संबंधित केंद्रीय विभागांनी सर्व विद्यापीठांकडून त्या त्या राज्यांतील महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन परीक्षा घेण्यासंबंधी प्रत्येक विद्यापीठाच्या सज्जतेचा अहवाल घेतला आहे का असा प्रश्न पत्राद्वारे विचारण्यात आला आहे.

तर, विद्यार्थ्यांची सुरक्षा, परीक्षा स्थळांवरील सेवक, परीक्षक आणि विद्यापीठांमधील प्रशासकीय सेवकांची सुरक्षा, याबद्दल काय नियोजन करण्यात आले आहे असेही विचारण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान एकाही विद्यार्थी वा परीक्षेशी निगडित सेवकाला करोनाची लागण झाली तर काय करणार यासह परीक्षेच्या कालावधीत कंटेन्टमेंट झोनमध्ये पुरेशी वाहतूक सुनिश्चित करण्यात आली आहे का? यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचारणा करण्यात आली असून त्याबद्दल सखोल स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

मासूने हे पत्र यूजीसीचे अध्यक्ष प्रा.डी.पी. सिंग, उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, सचिव प्रा. रजनीश जैन व उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांना पत्र पाठविले आहे. यूजीसीने त्वरित परीक्षांबाबत हस्तक्षेप करून विचार करावा आणि समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असे मासूने स्पष्ट केले आहे.

या पत्राची प्रत केंद्रीय गृह मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, बार काउन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.

जर यूजीसीने आमच्या पत्राला प्रतिक्रिया दिली नाही व समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. यात आम्ही केंद्र आणि राज्य सरकार तसेच सर्व संबंधितांना प्रतिवादी बनवू.

- सिद्धार्थ इंगळे, संस्थापक-मासू

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com