ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता; रुग्णांना दुर्गंधीचा त्रास

ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता; रुग्णांना दुर्गंधीचा त्रास

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात (Rural Hospital) ठिकठिकाणी अस्वच्छता (unsanitary) दिसून येत असल्याने रुग्णांसह त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयातील खोल्यांमधील बेड, औषध ठेवण्यासाठी असलेले टेबल यांवर धुळ साचली असून गेल्या कित्येक दिवसांपासून त्याची स्वच्छता झाली नसल्याचे रुग्ण सांगत आहेत. रुग्णालयात प्रशासनाकडून रुग्णांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच सुरु असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोरोना (corona) काळात सिन्नरकरांना वरदान ठरणार्‍या याच रुग्णालयातून कित्येक रुग्ण (patient) बरे होऊन सुखरुप घरी परतले. कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना येथे चांगले उपचार मिळाल्यामुळे अनेकांनी रुग्णालयाची प्रशंसाही केली.

कोरोना (corona) काळात रुग्णालयात वेळोवेळी स्वच्छता होत होती. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही (District Administration) रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना वेळोवेळी सूचना करण्यात येत होत्या. त्याची अंमलबजावणीही चांगल्या प्रकारे करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा जोर ओसरताच रुग्णालयाच्या अधीक्षकांसह इतर सेवकांनाही मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणार्‍या बदलामुळे सिन्नर शहरासह (sinnar city) ग्रामीण भागात सर्दी (cold), खोकला (Cough), ताप (fever) अशा रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, येथील अस्वच्छता बघून रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.

रुग्णालयातील अनेक खोल्यांमधील बेड हे धुळखात पडले असून औषधांचे टेबल, रुग्णालयातील फरशी वेळोवेळी साफ होत नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालयात साधी झाडझुडही होत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. रुग्णालयाच्या बाहेरील परिसरातही ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. पाठीमागील बाजूस औषधांची रिकामे पाकिटे, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, गुटखा (gutkha) - तंबाखूच्या (tobacco) रिकाम्या पुड्या पडलेल्या दिसून येतात.

रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी गुटखा, तंबाखूच्या पिचकार्‍यांचे डागही दिसून येतात. येथील सेवकांकडूनच हे काम केले जात असल्याचा आरोप रुग्ण करत आहेत. त्यामुळे अधिक्षकांनी यात लक्ष घालावे व रुग्णालयात वेळोवेळी स्वच्छता करण्याच्या सूचना सेवकांना द्याव्यात. रुग्णांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी होत आहे.

नगरपरिषदे रुग्णालय बंद होणार

सिन्नर नगर परिषदेचे रुग्णालय कायमचे बंद करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचा भार आता ग्रामीण रुग्णालयावर पडत आहे. ग्रामीण रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने मुख्याधिकारी संजय केदार यांनी नगरपरिषदेचा दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.

यामुळे नगर परिषदेवरील सात ते आठ लाखांचा अतिरिक्त भार कमी होणार आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयावर येणार्‍या भारावर अधीक्षकांनी लक्ष देऊन नियोजनबद्ध कामकाज करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गोरगरिबांचा नगरपरिषदेचा दवाखाना बंद झाल्याने तेथे मिळणार्‍या सुविधा, औषधे ग्रामीण रुग्णालयातही मिळावीत अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com