येवला शहरात अनोखे आंदोलन

येवला शहरात अनोखे आंदोलन

येवला । प्रतिनिधी yevla

शहरातील विविध समस्या प्राधान्याने सोडवणे गरजेचे असताना काँग्रेसच्या Congress वतीने अनेक वेळा निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या येवला शाखेच्या वतीने समस्यांबाबत शहरातील देवी खुंट येथे जागरण - गोंधळ Jagran - Gondhal Agitation करण्यात आला.

येवला शहरातील विविध समस्यांबाबत नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जागरण गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले. शहरातील नादुरूस्त रस्ते त्वरित दुरूस्त करावे, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, कर आकारणी कमी करावी, शहरातील बंद असलेले पथदिवे सुरू करावे, शहराततील अस्वच्छता दूर करावी, अमरधाममध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या करत शहरातील समस्यांबाबत नगरपालिकेला जागृत करण्याकरता काँग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये जागरण-गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले.

येवले शहरातील व वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे होऊन रस्त्यांची चाळणी झालेली आहे. पाऊस पडल्यानंतर तर रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. तसेच शहरात व वसाहतीत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहराची व रस्त्यांची नियमितपणे साफसफाई होणे आवश्यक आहे. शहरांमध्ये जंतुनाशक फवारणी करणे व शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा करणे, शहरातील पथदीप सुरू करणे, स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात येऊन अंत्यविधी- समयीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे तसेच शहरातील नागरिकांना छोट्या छोट्या कामासाठी नगरपालिका दूर असल्याकारणाने मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होतो.

त्यामुळे शहरातील जुन्या नगरपालिका कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करावी, व्यापारी संकुलाचा प्रश्न त्वरित सोडवून गाळेधारकांना प्राधान्य देण्यात यावे, शहरातील मोकाट जनावरांचा, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, बाजारतळाचा प्रश्न तातडीने सोडवावा, विंचूर चौफुली येथे सिग्नल बसवण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी आज येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जागरण-गोंधळ घालण्यात येऊन समस्यांचा पाढा वाचण्यात आला. यापूर्वीही काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेला वेळोवेळी शहरातील समस्यांबाबत निवेदन व वेगवेगळ्या आंदोलनाद्वारे कळवले होते. परंतु नगरपालिकेने समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे येवले शहरात हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, जरार पहिलवान, अनिल पहिलवान, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, नंदकुमार शिंदे, सुखदेव मढवई, युवक अध्यक्ष मंगल परदेशी, अण्णासाहेब पवार, अमित पटणी, राजेंद्र गणोरे, राजे आबासाहेब शिंदे, अजिज शेख, मुकेश पाटोदकर, भास्कर पालवे, शफीक शेख, कैलास घोडेराव, दत्तू भोरकडे, शिवनाथ खोकले, गणेश ढिकले, दयानंद बेंडके, अशोक नागपुरे, बाबूलाल पडवळ, राजवीर शिंदे, बाबासाहेब गोरे, अहिलाजी झांबरे, गणेश पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षल लाघवे, नितीन वंजारी, मोनिका वंजारी, रंगनाथ शेलार यांनी गोंधळ साजरा केला.

शहरात सर्वत्र अस्वच्छता आहे. शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. पथदीपांचा विषय अनेक वेळा घेऊनही सुधारणा होत नाही. नगरपालिका प्रशासन सुस्त आहे. व्यापारी संकुल उभे आहे. ही इमारत आता पडून आहे. परंतु प्रशासनाला हे गाळे पडित ठेवण्यातच आनंद होत आहे.

- अ‍ॅड. समीर देशमुख, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

Related Stories

No stories found.