नाशिक । वैशाली शहाणे

परीक्षा व्हायला हव्यात ही साक्षर आणि मध्यमवर्गीय पालकांची मानसिकता आहे. पण मुलांना शिक्षणाची संधीच मिळालेली नाही. शाळाही भरली नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कोणतीही आंतरक्रिया घडली नाही. घरात माहिती तंत्रज्ञानाची सुविधा नाही मग आमच्या मुलांनी कशाची परीक्षा द्यायची असा ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील पालकांचा सवाल आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षांचा नेमका अर्थ समजावून घ्यायला हवा असे मत शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी व्यक्त केले.

परीक्षा म्हणजे नेमके काय?

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवरती दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात की ऑफलाईन यावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्याचेवळी राज्यात प्राथमिक स्तरावरील दहावी वगळता पहिली ते अकरावी पर्यंतचे विद्यार्थी कोणत्याही परीक्षेशिवाय पुढील वर्गात जाणार आहेत. परीक्षेसंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. एकिकडे शिक्षण म्हणजे परीक्षेव्दारे मापन केली जाणारी व्यवस्था.

परीक्षा हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजण्याचे साधन मानले जाते. त्यामुळे संपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया परीक्षेभोवती केंद्रीत झाली आहे. शिक्षणापेक्षा परीक्षाच केंद्रस्थानी राहिल्याने सद्यस्थितीत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळात आपण परीक्षा का घेतो? तर विद्यार्थ्याला जे काही शिकविले आहे ते त्याला कितपत आकलन झाले आहे त्याची पडताळणी करण्यासाठी.

विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडथळे जाणून घेणे, त्याला जे काही जाणता आलेले नाही त्यासाठी पुन्हा नव्याने शिकवून त्याचे पुनर्भरण करणे अपेक्षित असते. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचा दर्जा निश्चित करणे नाही. त्यांच्यात हुशार, मठठ असे वर्गीकरण अपेक्षित नसते. त्यामुळे परीक्षेच्या आधारे वर्गोन्नती अपेक्षित नाही असे वाकचौरे म्हणाले.

परीक्षांचा मूळ हेतू काय?

प्राथमिक शिक्षणात ज्यांनी प्रचंड मोठे काम केले आहे ते शिक्षणतज्ज्ञ गिजूभाई बधेका म्हणत असत, ज्या पस्तीस मार्काच्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण होतो आणि तो पुढच्या वर्गात जातो. मात्र त्याचवेळी 34 गुण मिळविणारे विद्यार्थी मात्र अनुत्तीर्ण होतात. तो एक गुण कोणता असतो ? ज्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण होतो? समजा एखादया विद्यार्थ्यास कविता पाठ नाही म्हणून त्याचा एक गुण गेला. मात्र तो ज्या कारणाने कविता पाठ करू शकला नसेल ती कविता पुढच्या आठवडयात पाठ करेल. मात्र कविता पाठ नाही म्हणून तो नापास झाला आणि एक वर्ष वाया गेले. हे योग्य आहे का? परीक्षांचा अर्थ केवळ विद्यार्थी काय शिकला आणि काय शिकला नाही हे पाहाणे आहे. त्यामुळे परीक्षांच्या मूळ हेतूचा विचार न करता परीक्षांना अतिरिक्त महत्व शालेय स्तरावर असता कामा नये.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय?

करोनामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने शिकणे होऊ शकलेले नाही. अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा कोणत्या आशयावरती घेणार हा प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थी जर वेगळ्या अनुभवातून शिकला असेल तर समान साधनाचे व्दारे परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारे ठरेल.

त्यातही शहरी भागात पालकांचा आर्थिक स्तर, पालकांची माहिती तंत्रज्ञान विषयी असलेली जागृती, विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारी सुविधा यामुळे त्यांना ऑनलाईन परीक्षा शक्य आहेत. मात्र ग्रामीण भागात तर परीस्थिती शहरी भागापेक्षा विषम आहे. आजही डोंगराळ, आदिवासी क्षेत्रात नेटवर्क नाही. परीक्षेसाठी लागणार्या सुविधा नाहीत. एकदा आपण हे वास्तव स्विकारायला हवे. केवळ जगाचे प्रयत्न आहेत म्हणून त्यामागे चालत राहाणे घडता कामा नये.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ यशपाल काय म्हणाले होते?

माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आपल्याला अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज आहे. सद्यस्थिती ती गरज भागविण्याची शक्यता नाही. यशपाल म्हणतात, तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग याचा अर्थ कल्पक शिक्षकांची संख्या कमी करणे आहे. त्यामुळे वर्तमानात विद्यार्थी परिस्थितीने शिकतील. हवे तर त्या शिकण्याचे मूल्यमापन करा, पण त्या मूल्यमापनाची सोय वर्तमानातील शिक्षणात नाही ही देखील अडचणच आहे. पण तरीही दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यांचे नियोजन करताना सर्व विद्यार्थ्यांचा विचार करावा लागणार आहे असेही मत वाकचौरे यांनी व्यक्त केले.