नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

दहावी, बारावीसह राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कधी, कशा होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

विविध अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षांची वेळापत्रके दरवर्षी डिसेंबपर्यंत जाहीर होतात. यंदा अद्यापही कोणत्याही परीक्षांबाबत स्पष्टता नाही.

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या राज्यमंडळाच्या परीक्षा यंदा मे-जूनमध्ये घेण्याच्या दृष्टीने राज्यमंडळाची चाचपणी सुरू आहे. आयआयटीसह विविध राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील सामायिक परीक्षा (जेईई) दोन वेळा घेण्यात येते.

त्यातील पहिली परीक्षा जानेवारीत होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षा मे महिन्यात होते. या परीक्षा होणार का, पुढे ढकलण्यात येणार का, याबाबतही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा कक्षाने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या यंदाच्या तुकडीची प्रवेश प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षानेही पुढील परीक्षांबाबत निर्णय जाहीर केलेला नाही.

ढाेबळ रूपरेषा तरी जाहीर करा

प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या की त्यानुसार विद्यार्थी नियोजन करतात. अनेक विद्यार्थी एकापेक्षा अधिक परीक्षा देतात. त्यामुळे कोणती परीक्षा कधी होणार आहे याचे नियोजन विद्यार्थी करतात.

‘शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या प्रत्यक्ष सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात राहून अभ्यास करत आहेत. ऑनलाइन वर्गही सुरू आहेत.

त्यामुळे परीक्षा कधी होणार याची ढोबळ रूपरेखा तरी राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षाने आता जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी नियोजन करू शकतील, असे विद्यार्थ्यांचे मत आहे.