शहादा येथील अनधिकृत बायो डीझेल पंप सील
नाशिक

शहादा येथील अनधिकृत बायो डीझेल पंप सील

देशदूतचा पुन्हा दणका, पंप सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Rakesh kalal

शहादा । SHAHADA

प्रकाशा रस्त्यावर वीज वितरण केंद्रालगत असलेला अनधिकृतपणे थाटण्यात आलेला बायोडिझेल पंप अखेर प्रशासनाने सील केला आहे, हा पंप...

पुन्हा सुरू केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पंपचालकाला दिला आहे. या पंपवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलिंगपथक तैनात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. या अनधिकृत पंपवर कारवाईच्या भीतीपोटी दिवसा बंद तर रात्री सुरू सुरूच ठेवण्याचा प्रकार पंपचालकाकडून केला जात होता.

यासंदर्भात देशदूतने वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, शासनाच्या महसुलला चुना लावणार्‍या या अनधिकृत बायोडिझेल पंपवर तीन दिवसांपूर्वी 20 हजार लिटर बायोडिझेल खाली करण्यात आल्याची विश्वसनिय माहिती असून प्रशासनाने त्याबाबत सखोल चौकशी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शहादा येथील प्रकाशा रस्त्यावर वीज वितरण कंपनीच्या केंद्रानजिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय बायोडिझेल पंप थाटण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनधिकृत बायोडिझेल पंपबाबत देशदूतने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.

जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील अश्या बायोडिझेल पंपांवर कारवाई करून पंप कायमचे सील केले आहेत. मात्र, शहादा येथील बायोडिझेल पंप चालकाने नामी शक्कल लढवित दिवसा पंप बंद तर रात्रीच्या अंधारात पंप सुरू ठेवण्याचा प्रकार शोधून काढला होता.

रात्रीच्या वेळी या पंपांवर मोठया ट्रकामध्ये डिझेल भरण्याचा प्रकार सुरू होता. शासनाच्या महसुलला चुना लावणार्‍या या अनधिकृत पंपबाबत देशदूतने वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले.

तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करीत हा पंप अखेर सील केला तसेच हा पंप सुरू केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पंपचालकाला देण्यात आला आहे.

प्रशासनाच्या कारवाईमुळे पंप चालकांचे धाबे दणाणले आहे.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या पंपवर तीन दिवसांपूर्वी 20 हजार लिटर बायोडिझेलचा साठा करण्यात आला असून गुजरात राज्यामधून रात्रीच्या वेळी प्रशासनाची नजर चुकवत हे डिझेल आणण्यात आले आहे.

दैनंदिन वापरातील डिझेलपेक्षा 20 ते 25 रुपये स्वस्त दरात बायोडिझेल मिळत असल्याने अनेक वाहनधारक या पंपावरील बायोडिझेलचा वापर करीत आहेत. शासनाला या अनधिकृत बायोडिझेलमुळे मोठया प्रमाणात महसुलवर पाणी सोडावे लागत आहे.

वास्तविक, दैनंदिन वापरातील डिझेल व ओरिजनल बायोडिझेल (बी 100) या दोन्ही इंधनामध्ये केवळ पाच ते सहा रुपये फरक असताना या अनधिकृत पंपांवर 20 ते 25 रुपये स्वस्त दराने बायोडिझेल विक्री होत असल्याने या इंधनात भेसळ होण्याची दाट शक्यता आहे

त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची निःपक्ष चौकशी करणे आवश्यक आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात बायोडिझेल पंपांवर कारवाई होत असताना शहाद्यात या पंप चालकांकडे तीन दिवसांपूर्वी 20 हजार लिटर बायोडिझेल येतेच कसे? या प्रश्नची उकल होणे अपेक्षित आहे.

शिवाय प्रशासनाने या पंपवर केवळ सील करण्याची कारवाई मार्यदित न ठेवता या पंपचालकाने पंप सुरू केल्यापासून आतापर्यंत शासनाचा किती महसूलला चुना लावला, या डिझेलमध्ये कुठल्या इंधनाची भेसळ होते आदी बाबींची चौकशी अपेक्षित आहे.

बायोडिझेल पंप अनधिकृत असून त्यास शासनाची अथवा प्रशासनाची कुठलीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनधिकृतपणे बायोडिझेल विक्री करणार्‍या या पंपला सील करण्यात आले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अवैधमार्गाने हा पंप सुरू केल्यास पंपचालकावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. या पंपवर तसेच अन्य पंपवरील रात्रीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी यांचे पेट्रोलिंग पथक गठीत करण्यात आले आहे.

-डॉ. मिलिंद कुलकर्णी तहसीलदार

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com