
नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :
एका बुलेटस्वाराने ट्रकच्या मागे जोरात धडक दिल्याने या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू झाला असून, पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाल्याची घटना लेखानगर येथील सुविधा हॉस्पिटलसमोर घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, हेमंतकुमार व्यंकप्पा करकेरा (३९, रा. मृत्युंजय को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, कन्नमवारनगर, विक्रोळी पूर्व, मुंबई) हे व त्यांचे मित्र नितीन मोहन मोरे, एमएच ४८ एएन २८३६ या क्रमांकाच्या बुलेटवरून जात असताना त्यांची बुलेट मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर सुविधा हॉस्पिटलसमोर एमएच ०४ डीके २४०६ या क्रमांकाच्या ट्रकवर आदळल्याने नितीन मोरे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर असलेले करकेरा हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बेडवाल करीत आहेत .