
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मनमाड (Manmad) येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासह दोन खासगी कंत्राटदारांना २० हजार रुपयांची लाच (Bribe) घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत रंगेहात पकडले...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका तक्रारदाराच्या घराच्या छतावरील पाईपास ३३ केव्हीची बंदस्थितीतील विद्युक वाहक तार अनधिकृतपणे बांधली असल्याने ही धोकादायक तार हटवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनीच्या मनमाड कार्यालयात अर्ज केला होता.
यावरून येथील सहायक अभियंता महेंद्र श्रावण चव्हाण (Mahendra Chavhan) (३७, रा. नवकार रो-हाऊस नं. ६, शरयू पार्क- २, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव, नाशिक) यांनी कुठलीही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता त्यांचे निकटवर्तीय खासगी कंत्राटदारांना कामासाठी नेमले.
यावेळी कंत्राटदार कुणाल दादा ठाकरे (Kunal Thakare) (३०, धंदा खासगी कंत्राटदार, रा. शिक्षक कॉलनी, ता. मनमाड, नाशिक), अंकुश मोठाभाऊ डुकळे (Ankush Dukle) (२९, धंदा : खासगी कंत्राटदार, रा. मु. पो. झाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांना तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली.
त्यानुसार कुणाल ठाकरे याने मनमाड येथील तक्रारदाराच्या दुकानात जाऊन २० हजार रुपयांची लाच स्विकारत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसमोर ते अडकले.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्राचे अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार बाविस्कर, प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.