
सिन्नर | वार्ताहर | Sinnar
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) तालुक्यातील गोंदेश्वर (Gondeshwar) येथे आज (दि.२० जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास कारचा भीषण अपघात (Terrible Accident) होऊन दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे...
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबली होती. नवीन महामार्ग असल्याने महामार्गावरून मार्गक्रमण करताना चालकांचे नियंत्रण सुटत होते. गेल्या महिनाभरापासून समृद्धीवर किरकोळ अपघात वगळता कुठलाही भीषण अपघात झाला नव्हता. मात्र, आज (दि.२० जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा कारचालकाचे नियंत्रण सुटून दोघांना जीव गमवावा लागला आहे.
नाशिककडून-शिर्डीकडे ( Nashik to Shirdi) जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. १४. ई. वाय. ७१९८ ही कार गोंदेश्वरात आली असता अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट दोन्ही रस्त्यांच्यामध्ये असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. यामुळे कार चालक हर्षल भोसले व श्रीकांत थोरात हे दोघे जागीच ठार झाले. तर अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
दरम्यान, यावेळी महामार्गाने जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तात्काळ पोलिसांना (Police) याबाबत माहिती दिली. त्यानंतर महामार्ग पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी येत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात (Sinnar Rural Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.