
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad
उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार झाले असून त्यात एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खरजुळ मळा, टाकळी रोड परिसरातून अभिषेक रमेश परदेशी (29 रा. गणनाथ हाऊसिंग सोसायटी, सह्याद्री कॉलनी, कॅनल रोड, जेलरोड) हे आपली एक्टिवा गाडी क्रमांक एम. एच. 15 एच. व्ही. 2392 या गाडीवरून टाकळीरोड वरून नारायण बापू चौकाकडे येत होते.
याच दरम्यान समोरून येणाऱ्या एम. एच. 15 सी. के. 2248 या छोटा हत्तीसारख्या वाहनाने परदेशी यांच्या एक्टिवा गाडीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांच्या डोक्याला मार लागला.
त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. या प्रकरणी प्रशांत रमेश पवार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माहीतकर यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार बटुळे हे करत आहे.
तर दुसरा अपघात विहित गाव रस्त्यावर झाला. कृष्णा आशुतोष दुबे (16, रा. जय भवानी रोड नाशिकरोड) हा विद्यार्थी आपल्या दुचाकी गाडीवर घरून विहित गाव रोडने केंद्रीय विद्यालयात जात असताना त्याच्या दुचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो खाली पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.