रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन ठार

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन ठार

ताहाराबाद । वार्ताहर Taharabad

अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबा दर्ग्यावर दर्शनासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस भरधाव रूग्णवाहिकेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिता-कन्या जागीच ठार तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली. ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावर वाकी नाल्याच्या वळणावर आज सकाळी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादास महाजन (३५ ) हे पत्नी नीलम (३०) व कन्या आर्या (७) यांच्यासह आपल्या मो. सायकलवरून आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबा यांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जात होते. अकस्मात वाकी नाल्याच्या वळणावर आलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरधाव रूग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिल्याने राहुल महाजन व त्यांची कन्या आर्या (७) हे फेकले जावून डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच मृत झाले तर पत्नी नीलम या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने मालेगावी खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात रूग्णवाहिका चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सामाजिक कार्यात राहुल महाजन सदैव अग्रेसर राहत असल्याने ते लोकप्रिय होते. त्यांच्यासह कन्येच्या अपघाती निधनाचे वृत्त गावात येताच ग्रामस्थांना धक्का बसला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com