अपहरण झालेल्या दोन मुली पालकांच्या स्वाधीन

उपनगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक
अपहरण झालेल्या दोन मुली पालकांच्या स्वाधीन

नाशिकरोड । प्रतिनिधी

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे व सहकार्‍यांनी शोधून काढले. करोना काळातील बंदोबस्त, नाकाबंदी व इतर ताण-तणावातून वेळ काढून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला व सुखरुप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

पहिल्या घटनेत आर्टिलरी सेंटररोडवर राहणारी 14 वर्षाची मुलगी हरवली होती. तीच्या आईने 20 एप्रिलला उपनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. तक्रारीत म्हटले होते की, 19 एप्रिलला रात्री घराजवळील साईकिरण दुकानातून काडीपेटी घेऊ येते असे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. तीचा शोध घेऊनही ती सापडली नाही.

अज्ञात व्यक्तीने तिला फूस लाऊन पळवून नेले असे तक्रारीत म्हटले होते. मुलीस फूस पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द दाखल केला होता. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, पोलिस गायकवाड, बहिरट आदींचे पथक तयार करण्यात आले होते. ही मुलगी मुंबई नाका येथील रुग्णालयात असल्याचे समजले पोलिस तेथे गेल्यावर ही मुलगी जत्रा हाटेलसमोरील अपार्टमेन्टमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले.नंतर पालकांच्या ताब्यात दिले.

दुसर्‍या घटनेत जयभवानीरोडवरील पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता होती. तीचे पालक पंचवटीत देवदर्शनासाठी गेले होते. घरी परतल्यावर आपली मुलगी त्यांना दिसली नाही. शोध घेऊनही ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिस गणपत काकड, मधुकर दावले आदींनी शोध घेतला असता ही मुलगी भिवंडी बसस्थानकावर असल्याचे समजले. तेथे जाऊन तिला पोलिसांनी आणून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

करोना काळातील बंदोबस्त, नाकाबंदी व इतर ताण-तणावातून वेळ काढून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला व सुखरुप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com