बिबट्याच्या हल्ल्यात चुलते-पुतणे जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात चुलते-पुतणे जखमी

आगासखिंड येथील घटना


सिन्नर । Sinnar
तालुक्यातील आगासखिंड येथे सोमवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत दोघा चुलते पुतण्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची या परिसरातील सहावी घटना असल्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय ज्ञानेश्वर बरकले (वय.22 ) व त्यांचा पुतण्या ओमकार वसंत बरकले (वय 17) हे दोघे रात्री साडेदहाच्या सुमारास गहू सोंगणीला हार्वेस्टर सांगण्यासाठी कडवा कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने जात असतांना डॉ. संदीप लहांगे यांच्या बंगल्यासमोर कालव्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप घातली.

या हल्ल्यात पाठीमागे बसलेल्या ओमकार याचा उजवा हात बिबट्याने जबड्यात धरला. त्यामुळे ओमकारच्या हाताला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. त्यानंतर अक्षय यांच्या पाठीवर देखील बिबट्याने पंजा ओरबडल्याने तेही किरकोळ जखमी झाले. याच दरम्यान अक्षयचा तोल जाऊन दुचाकी खाली पडली.

चवताळलेल्या बिबट्याने डरकाळ्या फोडत त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अक्षय यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा हॉर्न वाजवल्याने बिबट्याने अंधाराच्या दिशेने धूम ठोकली.

जखमी झालेल्या अक्षय व ओमकार यांना अनिल बरकले यांनी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार केले.


दरम्यान, या परिसरात बर्‍याच दिवसांपासून बिबट्याचा वावर असून वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नांगरीकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com