नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून दररोज सरासरी दोनशे ते दोनशे पन्नास नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल होत आहेत.

यामुळे जिल्ह्यात नव्या करोना रूग्णांचा सरासरी आकडा दिड हजार इतका झाला आहे. करोना रूग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंताही वाढल्या आहेत. मार्च 2020 पासून जिल्ह्यातील आतापर्यंत करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 19 हजार 606 इतका झाला आहे.

मागील चोवीस तासात 252 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर मागील महिन्यात हे प्रमाण 111 इतके कमी झाले होते. परंतु नागारीकांचे मास्क, सॅनिटायझर वापर, करोना नियम पाळण्याबाबत झालेले दुर्लक्ष, बदलते वातावरण यामुळे पुन्हा करोनाने जिल्ह्यात वर डोके काढल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे मागील चोवीस तासात 62 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 15 हजार 790 वर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण करोना मुक्तीचे प्रमाण घसरून 96.81 टक्केंवर पोहचले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 252 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 157 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 78 हजार 498 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 59 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 35 हजार 14 झाला आहे. मालेगावात 27 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 4 हजार 883 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 1 हजार 211 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून सरासरी दररोज 2 ते 3 रुग्णांचा मृत्यू होत आहे. मागील 24 तासातही तीघांचा मृत्यू झाला असून एक नाशिक शहरातील तर दोघे ग्रामिण भागातील आहेत.

यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 85 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 710 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 683 रूग्ण नाशिक शहरातील आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 1,19,606

* नाशिक : 78,498

* मालेगाव : 4,883

* उर्वरित जिल्हा : 35,014

* जिल्हा बाह्य ः 1211

* एकूण मृत्यू: 2085

* करोनामुक्त : 1,15,790