नाशकात रुग्णसंख्या १२ हजारांच्या घरात; सुरु होणार दोन नवे कोविड सेंटर्स

नाशकात रुग्णसंख्या १२ हजारांच्या घरात; सुरु होणार दोन नवे कोविड सेंटर्स

नाशिक | Nashik

नाशिक शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १२ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. नुकतेच मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी ठक्कर डोम आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह येत पाहणी केली असून दोन्ही ठिकाणी लकरच कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत...

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिका आयुक्त जाधव यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह व ठक्कर डोम येथे पाहणी करून विविध प्रकारची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत.

शहरात करोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत.

भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास त्या रुग्णांना राहण्याची व्यवस्था मनपाच्या हॉस्पिटल मध्ये करण्यात आलेली असून त्यामध्ये असणारे बेड अपुरे पडल्यास भविष्यातील उपाययोजना म्हणून पूर्वी सुरू असलेले डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कोविड सेंटर व ठक्कर डोम हे आवश्यकता भासल्यास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कोविड सेंटर येथे सध्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांना एका स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित करून उर्वरित इमारतीत कोरोना रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या आहेत.

तसेच ठक्कर डोम येथे पाहणी करून येथील कक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वीप्रमाणेच अद्यावत अशी व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित विभागास दिल्या.

याप्रसंगी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, विवेक धांडे, कार्यकारी अभियंता राजू आहेर, करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, क्रेडाईचे अभिषेक ठक्कर, बागड आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com