सुरगाण्यात पावसाचा हाहाकार; वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू

सुरगाण्यात पावसाचा हाहाकार; वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. करवंदे येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एका बैलाला विजेचा शॉक बसल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. येथील हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यांचे पशुधन हिरावल्यामुळे शेतकऱ्याचा पाय अधिक खोलात रुतला आहे...

अधिक माहिती अशी की, काल (दि ०५) सायंकाळपासून जोरदार पावसाचे आगमन सुरगाणा तालुक्यात झाले होते. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात बरसलेल्या पावसामुळे सगळीकडे तारांबळ उडाली.

येथील करवंदे विज पडून चिंतामण चिमण चव्हाण या शेतकऱ्यांचे दोन बैल शेतातच मृत्युमुखी पडले. तर एका बैलाला विजेचा जोरदार शाॅक बसला. घटनेची नैसर्गिक आपत्ती विभागाने तात्काळ दखल घेत तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवून माहिती घेतली.

घटनास्थळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण आठरे यांनी पशुचिकित्सक श्रीकांत पवार, भावेश देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. पाहणी केली असता जनावरांच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. जनावरे परिपूर्ण ताठ पडलेल्या अवस्थेत पोट फुगून आले होते. याबाबत शांताराम पालवे यांने सांगितले की, गावापासून जवळच खडक उतारा टाकलीच्या शेतात चार ते पाच शेतकरी बैल चारत होते.

विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत गावित, सोनिराम चव्हाण, प्रकाश सहारे, बैल मालक चिंतामण चव्हाणांचा नातू चेतन चव्हाण यांनी लगतच्या एका झापाचा आसरा घेतला.

काही क्षणातच लख्ख प्रकाश पडताच कानठळ्या बसवणारा जोरदार आवाज झाला. नेमके काय झाले हे कळेनासे झाले. मात्र चेतनने झापाच्या भिंतीच्या छिद्रातून घटना प्रत्यक्षात बघितली. विज सरळ रेषेत पडल्याने नेमकी दोन ते तीन बैलावर पडली.

यावेळी जवळपास आठ ते दहा बैल चारा खात होती. आणि त्यांना चार शेतकरी चारत होते. चारही शेतकऱ्यांसह इतर बैल बालंबाल बचावले. तलाठी प्रकाश कडाळे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले असून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलीस पाटील भागवत सहारे, भिका चव्हाण, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.