बनावट ई पास बनवणाऱ्या दाेघांना अटक

नाशिक गुन्हेशाखेची कारवाई
बनावट ई पास बनवणाऱ्या दाेघांना अटक

नाशिक | Nashik

आंतरजिल्हा प्रवासासाठी बनावट कागदपत्रांवरुन ई पास बनवून देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले आहे. दोघांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांंत छगन मेतकर (५४, रा. पेठरोड) व राहुल रमेश कर्पे (३६, रा. मुंबई आग्रा रोड) अशी दोघांची नावे आहेत.

ठक्कर बाजार येथील हायटेक सायबर कॅफे येथे नागरिकांना ई पास काढून देण्याचे काम सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सापळा रचून बनावट ग्राहकास पाठवले.

विवाहानिमित्त धुळे येथे जाण्यासाठी ई पास काढून देण्यास संशयितांना सांगितले. मात्र संशयितांनी वैद्यकीय कारण द्यावे असे सांगितले. तसेच प्रवास करणाऱ्यांची आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या संकेतस्थळावरुन आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी मागितली.

याची माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळताच त्यांनी कागदपत्रांची शहानिशा केली. त्यावेळी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असल्याचा अहवालही जोडल्याचे समोर आले. प्रत्यक्षात प्रवाशांनी कोणत्याही प्रकारची चाचणी केलेली नव्हती. त्यामुळे दोघा संशयितांनी बनावट आरटीपीसीआर चाचणी अहवाल पोलिसांकडे सादर केल्याचे समोर आले.

त्यामुळे पोलिसांनी सायबर कॅफेत जाऊन कारवाई करीत तेथील लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले. तसेच चौकशीत मेतकर यांच्या सांगण्यावरुन राहुल वर्पे याने करोना चाचणी अहवाल एडीट करुन त्यावर प्रवाशाचे नाव टाकून बनावट चाचणी अहवाल पोलिसांकडे सादर केल्याचे समोर आले. यामुळे कोरोना चाचणीचा बनावट अहवाल तयार करुन त्यावरून ई पास तयार केले जात असल्याचे समोर आल्याने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार संजय मुळक, नाइक विशाल काठे, मनोज डोंगरे, शिपाई विशाल देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com