गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

अंबड पोलिसांची कारवाई
गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

अंबड पोलिसांनी ( Ambad Police Statiion ) दत्तनगर चुंचाळे ( Chunchale )येथे सापळा रचत एकास अटक करून त्याच्या साथीदाराकडून गावठी कट्टा हस्तगत केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप पवार यांना दत्तनगर येथे करण विजय सिंग हा गावठी कट्टा बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून त्यांनी वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार रवींद्रकुमार पानसरे, राकेश राऊत, पवन परदेशी, दिनेश नेहे यांच्यासह चुंचाळे परिसरात सापळा रचून करण सिंग याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कट्टा आढळून आला नाही.

मात्र त्याच्या मोबाईल मध्ये काढलेले दोन गावठी कट्टे यांचे फोटो आढळून आले. यावरून पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता गंजमाळ परिसरातील खडकाळी येथील राजू वाघमारे याच्याकडे गावठी कट्टा असल्याचे त्याने सांगितले.

यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व खडकाळी येथे वाघमारे याला गावठी कट्टा घेऊन येण्यास सांगितले व त्या ठिकाणी देखील पोलिसांनी सापळा रचला व राजू वाघमारे याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत करत त्याला व करण सिंग याला अटक करून त्यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

Related Stories

No stories found.