प्लाझमाच्या वाढीव रकमेसाठी पिस्तुलाचा धाक; नाशिकचे दोघे ताब्यात

प्लाझमाच्या वाढीव रकमेसाठी पिस्तुलाचा धाक; नाशिकचे दोघे ताब्यात

सिन्नर । वार्ताहर

सिन्नर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला प्लाझ्मा देण्याच्या बदल्यात अवास्तव पैशांची मागणी करणार्‍या व रुग्णाच्या नातेवाइकांसह रुग्णालयातील कर्मचार्‍यांना धमकावणार्‍या दोघांना सिन्नर पोलिसांनी रविवारी (दि.25) मध्यरात्री पंचवटी, सिडको परिसरातील वेगवेगळ्या लॉजमधून ताब्यात घेतले...

प्लाझ्मासाठी ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याने रात्री 11 वाजेच्या सुमारास दोघांनी पक्षी हुसकवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नकली पिस्तुलाचा धाक दाखवत रुग्णालय परिसरात एक बार उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवडे येथील एका रुग्णाला तातडीने प्लाझ्माची गरज होती. रुग्णाच्या नातेवाइकांकडून त्यासाठी शोध सुरु होता. त्यांना नाशिकमध्ये एका ठिकाणी प्लाझ्मा उपलब्ध झाला. प्लाझमासाठी 18 हजार रुपयांचा व्यवहार संबंधितांमध्ये ठरला होता.

शनिवारी (दि.24) दुपारी ठरल्याप्रमाणे नाशिक येथून एक युवक प्लाझ्माची बॅग घेऊन सिन्नरच्या संबंधित रुग्णालयात आला. तेथे डॉक्टरांनी नातेवाइकांना बॅगसाठी किती पैसे दिले, याबाबत विचारणा केली.

सर्वसाधारणपणे आठ हजारांच्या आसपास प्लाझ्मासाठी रक्कम देणे योग्य असून आपत्कालीन परिस्थितीत बॅग उपलब्ध झाल्याने 3-4 हजार रुपये जास्त देण्यास हरकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ठरलेल्या 18 हजार रुपयांऐवजी रुग्णांच्या नातेवाइकांनी त्या तरुणाकडे केवळ 12 हजार रुपये दिले.

नातेवाईकांनी कमी पैसे दिल्याने रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची विचारणा केली. डॉक्टर रुग्णालयात नसल्याने त्यांनी शिवीगाळ करत छर्‍याच्या पिस्तुलातून एक बार उडवत तेथून काढता पाय घेतला.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पथकाने रुग्णालयात धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर त्या तरुणांनी एक पिस्तूल टेबलवर काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तातडीने नाकाबंदी करण्यात आली.

पोलिसांनी दुपारी प्लाझ्मा घेऊन आलेल्या तरुणांबद्दल माहिती मिळवत त्याचे नाशिकरोड येथील घर गाठले. मात्र, त्यांना घडल्या प्रकाराबद्दल कल्पना नव्हती. प्लाझ्मा सिन्नरला पोहचविण्याचे व पैसे घेऊन येण्याचे एक हजार रुपये मला भेटले, असे त्याने सांगितले.

त्याच्या माहितीवरून पोलिसांनी पंचवटी परिसरातील एका लॉजवर छापा टाकला. तेथे झोपलेल्या विकी जवरे (वय 20) रा. समतानगर, नाशिक व त्याचा दुसरा साथीदार शुभम धाडगे (वय 22) रा. टाकळीगाव यालाही ताब्यात घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com