
मालेगाव । प्रतिनिधी Nashik
शहरात करोनाचा उद्रेक थांबण्याची चिन्हे दिसत नसून अवघ्या सहा दिवसांत 421 बाधित रुग्ण वाढून पाच जणांचा बळी करोनाने घेतला. या रुग्णवाढीने बाधितांची संख्या 2 हजार 47 वर जाऊन पोहोचल्याने संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी प्रांत विजयानंद शर्मा यांनी आजपासून संचारबंदी लागू केली आहे. सायंकाळी 7 ते सकाळी 7 अशी 12 तासांची संचारबंदी संपूर्ण शहरात राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, करोना संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती आज पोलिसांतर्फे ध्वनिक्षेपकाद्वारे संपूर्ण शहरात देण्यात आली. संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.
करोनाचा उद्रेक शहरासह तालुक्यात फैलावत असल्याने जनतेसह प्रशासन यंत्रणेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज शंभरावर बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगावी तातडीने भेट देत आपत्कालीन बैठक घेतली. यावेळी रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यासह आरोग्य विभागामार्फत देण्यात आलेल्या निर्देशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस-प्रशासनाने पुढाकार घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्यांनी या बैठकीत दिले.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह, मनपा आयुक्त दीपक कासार, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजयानंद शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले आदी अधिकारी उपस्थित होते.
संचारबंदीतून रुग्णालये, मेडिकल, यंत्रमाग, पेट्रोलपंप यांनाच वगळण्यात येऊन उर्वरित सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देत जिल्हाधिकार्यांनी खासगी रुग्णालयांत बाधितांवर उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
मनपाने पथकांची नियुक्ती करून खासगी रुग्णालयांतील व्यवस्थापनावर लक्ष ठेवावे, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रांत शर्मा यांनी शहरात 12 तासांची संचारबंदी लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत ही संचारबंदी सुरू राहणार आहे.