ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या मंदावली होती, मात्र अचानक एकच दिवशी बारा पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढल्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात आतापर्यंत 1548 रुग्ण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात 1476 रुग्णानी करोनावर मत केली असून करोनामुळे तालुक्यात 48 लोकांचा मूत्यू झाला आहे, तर सध्या 24 करोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे.

मध्यंतरी तालुक्यात व जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या घटल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. जनतेने शासनाच्या नियमाचे पालन करणेही सोडून दिले होते. त्याप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमात बिनधास्तपणे वावरणे यामुळे सध्या तालुक्यात रुग्णाची संख्या झपाट्याने वाढतना दिसत आहे.

तालुक्यात सध्या शिक्षकांची करोना तपासणी करण्यात येत असून शिक्षकांची पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यत शाळा, महाविद्यालय चालू झाल्यापासून एकही विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजले नाही, मात्र शिक्षक करोना पॉझिटिव्ह होत आहे.

त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे का असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वच शिक्षण संस्थानी पालकांकडून विद्यार्थी हमीपत्र लिहून घेतले आहे, मात्र ज्यांनी हमीपत्र लिहून घेतले आहे. तेच पॉझिटिव्ह होत आहे.

त्यामुळे शाळा, महाविद्यालयातील सुरक्षतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे त्यांत जवळजवळ सर्वच शिक्षक बाहेरून अपडाऊन करत असल्यामुळे ते करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे.

दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेने कामाशिवाय गावाबाहेर जाणे थांबविले पाहिजे. त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे. शेतकरी वर्गाने मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन गेल्यास चांगली काळजी घ्यावी. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने गावात करोनाबाबत खबरदारी घ्यावी.

- डॉ. संदीप आहेर, प्रांत अधिकारी दिंडोरी - पेठ