नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना संकटामुळे अगोदरच आर्थिक तंगीत असलेल्या सर्वसामान्यांवर आता किराणा मालासाठी जादा दाम मोजावे लागणार आहे. आवक घटल्याने तूरडाळ शंभर रुपये किलो झाली असून गोडेतेल ११२ ते १५५ रुपये लिटरवर पोहचले आहे.

इंधनदरवाढीमुळे देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल शंभरीपार तर डिझेल नव्वदीपात प्रतिलिटर जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात आता किराणा मालाचे दर कडाडले आहेत. रोजच्या आहारातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तूरडाळीच्या किमंतीत मागील एक आठवडयात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे.

९० रुपये किलो असलेल्या तुरडाळीचे दर १०० रुपये किलो झाले आहेत. त्या तुलनेत मुगडाळीचे दर स्थिर आहेत. दिवाळीनंतर बाजारात आलेल्या डाळीचे साठा आता संपुष्टात येत आहे. नविन डाळ बाजारात येयला वेळ असल्याने तो पर्यंत डाळीच्या किंमती चढयाच असतील असे डाळीचे व्यापारी सांगतात. जालना, परभणी, अकोला येथून डाळी येतात. सध्या आवक कमी असल्याने दर वाढल्याचे पहायला मिळते.

गोडेतेल महागले

डाळीसोबत गोडे तेल महागले आहे. सोयाबीन तेल ११२ रुपये प्रतिलिटर व शेंगदाणा तेल १५५ रुपये लिटरने विकले जात आहे. पुढिल काळात तेलाचे दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

डाळीचे पिक मराठवाडा व विदर्भात घेतले जाते. दिवाळीनंतर आलेला डाळीचा साठा संपुष्टात येत आहे. डाळिचे नवे पीक बाजातपेठेत येईपर्यंत दर चढे राहणार आहेत.
कैलास मालपुरे, किराणा दुकानदार