
नाशिक । प्रतिनिधी
पेठ, हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी, येवला-२, चांदवड या प्रकल्पांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मे महिन्यापेक्षा कमी झाले असले तरी देखील कुपोषण दिसून येत आहे. जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण वाढणार नाही, याची काळजी सर्व संबंधीत प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व सर्व यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या.
महिला व बालकल्याण समितीची बैठक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.सभेस समिती सदस्य कविता धाकराव, गीतांजली पवार गोळे, गणेश अहिरे, मीनाक्षी चौरे, सुनीता सानप, कमल आहेर तसेच प्रभारी महिला व बालकल्याण अधिकारी बी. के. गर्जे व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.सभेत सर्वप्रथम कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला.
पेठ, हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी, येवला-२, चांदवड या प्रकल्पांमध्ये मे महिन्यापेक्षा संख्या जरी कमी झाली असली तरीदेखील कुपोषण दिसून येत आहे. यासाठी केलेल्या उपाय योजनांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने होम व्ही. सी. डी.सी. द्वारे बालकांना त्यांच्याच घरी कडधान्यांपासून बनवलेल्या अमायलेजयुक्त पिठांच्या विविध पाक कृतीद्वारे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे ज्ञान माताना देऊन आहारातील वारंवारीता वाढविण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर शासनाकडून आलेले एनर्जी फूडचे पाऊचही बालकांना घरी देण्यात आलेले आहेत. त्याचेही सेवन बालके करतात किंवा नाही, हे अंगणवाडी सेविका गृहभेटी देऊन पाहात आहेत. आहार किती वेळा दिला जातो, याची खात्री करत आहेत. याची अंमलबजावणी सर्वच प्रकल्पात करण्याच्या सूचना सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या.
जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी सर्व संबंधीत प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व सर्व यंत्रणांनी घ्यावी. बालकांची, गरोदर, स्तनदा मातांची नियमित आरोग्य तपासणी होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. बालकांंचे वजन घेऊन नियमित लसीकरण झाले पाहीजे. धाकराव यांनी प्रा. आ. केंद्रात टि. टि. ची लस उपलब्ध नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही सभापती आहेर दिली.
अंगणवाडी सेविकांनी गृहभेटी देताना करोना संसर्गाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता व काळजी घेऊनच गृहभेटी देण्यात याव्यात. गृहभेटी देताना सॅनिटायझर व मास्कचा वापर प्रामुख्याने करण्यात येऊन सेविकानी स्वतःची व बालकांची काळजी घ्यावी, अशा सक्त सूचना सभापती आहेर यांनी दिल्या.