करोनाकाळातही शासकीय रुग्णालयावर विश्वास

वर्षभरात यशस्वी 25 हजार प्रसुती
करोनाकाळातही शासकीय रुग्णालयावर विश्वास

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

गेल्या अडीच वर्षात करोनाने हाहाकार माजवला होता. जिल्ह्यातील प्रत्येकाला दवाखाना आणि डॉक्टर हा विषय अगदीच जिव्हाळ्याचा झाला होता. त्यातल्या त्यात शासकीय रुग्णालय हे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील रुग्णांसाठी हक्काचे ठिकाण झाले होते.

गेल्या एक वर्षात करोना रुग्णांवर उपचार करत असताना शासकीय रुग्णालयात तब्बल 25 हजार यशस्वी प्रसूती होऊन बाळांनी जन्म घेतला आहे. त्यामुळे करोना काळातही रुग्णांचा शासकीय रुग्णालयावर असलेला विश्वास यामुळे अधोरेखित झाला आहे. राज्यात करोनामुळे खिळखिळी असलेली आरोग्य व्यवस्था सक्षम होण्यास सुरुवात झालेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 31 शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी असलेल्या डॉक्टरांची टीम आणि अद्ययावत व्यवस्था यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना प्रसूतीसाठी वरदान प्राप्त झालेले आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान 25 हजर 337 बालकांचा जन्म शासकीय रुग्णालयात झाला आहे. यापैकी नॉर्मल 19 हजार 397 तर सिझेयरिंग 5 हजार 940 आहे.

आशेचा किरण

करोनामुळे सगळीकडे नैराश्येचे वातावरण असतानाच शासकीय रुग्णालयांबाबत सकारात्मकता यामुळे तयार होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्येक वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे शक्य होत नसते त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी तसेच तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. योग्य उपचारपद्धती, अद्ययावत संपूर्ण व्यवस्था आणि सक्षम डॉक्टरांची टीम यामुळेच हे शक्य आहे.

ही आहे आकडेवारी

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक 7 हजार 586 बालकांनी जन्म घेतला आहे. त्यानंतर मालेगाव शासकीय रुग्णालयात 3 हजार 361, मालेगाव 2 हजार 898, कळवण 1 हजार 125, नांदगाव 877, पेठ 769, मनमाड 728, त्र्यंबक 707, येवला 697, दिंडोरी 634, निफाड 569, हरसूल 551, सुरगाणा 536, चांदवड 443, वणी 368, सटाणा 360, बारहे 359, गिरनारे 346, नामपूर 319, घोटी 317, देवळा 199, लासलगाव 192, अभोना 172, डांगसौंदणे 90, इगतपुरी 71, नगरसुल 70, दोडी 69, झोडगे 52, उमराने 40, दाभाडी 31 आणि सिन्नर 1 आदी एकूण 31 शासकीय रुग्णालयांमध्ये 25 हजार 337 बालकांनी जन्म घेतला आहे.

Related Stories

No stories found.