
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी |Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वरचा (Trimbakeshwar) काही परिसर संवर्धन राखीव क्षेत्र (Conservation Zone) म्हणून घोषित झाल्याने येथील डोंगर दऱ्या सुरक्षित राहण्यास आणि निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मोठी मदत होणार आहे...
ब्रह्मगिरीची हिरवळ टिकवणे आणि गोदावरीचे पावित्र्य वाढविण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील (Nashik) पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला मोठे यश आले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींकडून (Nature lover) या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
मागील वर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी भागात (Brahmagiri Area) होणाऱ्या उत्खननावर निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा विषय कोर्टापर्यंत गेला होता, यासाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने लढा देत होते. तर जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Water expert Dr.Rajendra Singh) वनमंत्री, वनसचिव आणि निसर्गप्रेमींची बैठक झाली होती.
त्यानंतर आता यावर शासनाने राजपत्रद्वारे (Gazette) सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास १०० चौरस किलोमीटर परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरच्या परिसरासह ब्रम्हगिरी आणि गंगाद्वारचा परिसर देखील संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. तर काही नागरिक गाव, सर्वे क्रमांक, गट क्रमांक राखीव क्षेत्र याची माहिती मिळविण्यासाठी शासनाचे राजपत्र चाळत आहेत.
दरम्यान, वनविभागाच्या (Forest Department) अखत्यारीत त्र्यंबकेश्वर, हरसूल आणि नाशिक क्षेत्राचा काही भाग येतो. तसेच पूर्वी वाढोलीपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत अभयारण्य होते. मात्र सध्या तसे राहिले नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.