त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

गेल्या काही वर्षापासून तयार असलेल्या त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा अद्यापही धूळखात पडून आहे. त्यामुळे एका अर्थाने त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा असून अडचण व नसून खोळंबा असे होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान त्र्यंबक नगरपरिषदेवर मागील तीन वर्षापासुन भाजपची एक हाती सत्ता आहे. या काळात त्रिंबक नगरपरिषदे मार्फत तयार करण्यात येणारा शहर विकास आराखडा गत चार वर्षापुर्वी तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप हा विकास आराखडा पुर्णपणे मंजुर झाला नाही.

पण गेल्या काही दिवसांपासुन एकाएकी त्यातील आरक्षणे वगळुन रहिवासी झोन करण्याच्या हालचाली मात्र त्रिंबक नगरपरिषदेत सुरु झाल्या आहेत. त्र्यंबक गट नं.९३ हा सिंहस्थ वाहनतळ आरक्षण असलेला झोन वगळुन तेथे रहिवासी झोन करण्यात आल्याने साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिंहस्थ आरक्षण वगळयासाठी ऑनलाईन बैठकही घेऊन आरक्षण वगळण्याचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२० ला मंजूर करण्यात आला आहे. वाढीव योजने तील सिंहस्थ वाहन तळाचे आरक्षण बदलुन रहिवासी झोन नियोजन होत आहे.

नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ चा वापर करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गावापासून सात कि.मी.हलविण्याच्या हालचाली केवळ पालिका जागा देत नसल्याने घाटत आहे. कचरा डेपो प्रक्रिया प्रकल्पा सारखे महत्वाचे प्रकल्प जागे अभावी रखडले आहेत. मात्र त्याकडे लक्ष देण्यास पालिका पालिकेला फुरसत नाही, सुरवाती पासूनच हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप झाले होते.

आराखडा तयार करतांना नागरिकांच्या हरकतींना केराची टोपली दाखवत रहिवासी क्षेत्र वाढविण्यात आले आहे. दरम्यान पाच वर्षांपूर्वीतत्कालीन नगराध्यक्षांच्या पतीने यात ढवळाढवळ केल्याचा ठपका तेव्हाच्या मुख्याधिकारी यांनी नोंदवला होता. त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तो आराखडा नामंजुर केला आणि नवीन डीपी तयार करण्याचा आदेश दिला होता.

सन २०१७ ची योजना सन २०२० मध्ये भागश: मंजुर असल्याचे सांगण्यात आले. अद्याप वाढीव सुधारीत आरक्षणांची योजना मंजुर झाल्याचे अधिकृत जाहीर झालेले नाही. शहराच्या एका बाजूस असलेल्या डोंगरावरची सिंहस्थ वाहनतळ करिता आरक्षित असलेली जवळपास २१ एकर जागा रहिवासी झोन मध्ये करावी, या साठी नोटीस प्रसिध्द झाली आहे. विशेष म्हणजे डोंगराल क्षेत्रात सपाटीकरण होत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे.

करोना महामारीत नगर परिषदेने नोव्हेंबर२०२० रोजी ऑनलाईन सभा घेत डोंगराळ भाग असलेले २१ एकर क्षेत्र रहिवासी विभागात समाविष्ट करण्याचा ठराव केला. सभा ऑनलाईन असल्याने या विषयावर चर्चा झाली की नाही हे समजायला मार्ग नाही.

सिंहस्थ २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वरचा सिहस्थ कुंभमेळा आहे. सिंहस्थासाठी जागा आरक्षित असतांना त्यात फेरबदल केले जात आहेत. याबाबत साधु महंतांमध्ये काळजी व्यक्त होत आहे. नागरिकांना या फेरबदला बाबत ७ मार्च २०२१ पर्यंत सूचना व हरकत घेता येणार आहे.