Video : 'वसंत बहरला' जन्मशताब्दी सांगता समारोहात कानेटकरांना मानवंदना

Video : 'वसंत बहरला' जन्मशताब्दी सांगता समारोहात कानेटकरांना मानवंदना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाने अखिल नाट्यसृष्टीला वेगळा आयाम देणारे दिवंगत ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर (Vasant Kanetkar) यांच्या आठवणींना गोखले एज्युकेशन सोसायटीच्या (Gokhale Education Society) प्रि. टी. ए. कुलकर्णी हॉलमध्ये उजाळा देण्यात आला. विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली...

निमित्त होते प्रा. वसंत कानेटकर जन्मशताब्दी सांगता समारोहाचे आणि ज्या महाविद्यालयात त्यांनी २७ वर्षे प्राध्यापिकी केली त्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवी शुभारंभ सोहळ्याचे.

मनमोहक रांगोळी, वसंतात फुललेल्या फुलांची आरास, नाट्यगीत, अभिवाचन, चित्रफीत, मनोगते अशा विविधांगी माध्यमांतून प्रा. कानेटकर यांच्या नाट्य, साहित्य आणि प्राध्यापिकी सेवेचा मान्यवरांनी गौरव केला तेव्हा कानेटकर आपल्यातच असल्याची अनुभूती उपस्थितांना लाभल्याने 'वसंत' बहरला. महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे (Dr. Vrinda Bhargave) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महासंचालक डॉ. मो. स. गोसावी (Dr. M. S. Gosavi) होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मो. स. गोसावी यांनी कानेटकर आपल्यामध्ये अवतरले असल्याने त्यांना आपण उभे राहून मानवंदना द्यावी, असे आवाहन करताच भारावलेल्या उपस्थितांनी क्षणाचा विलंब न करता उभे राहून आदरांजली व्यक्त केली.

डॉ. गोसावी यांनी एचपीटी महाविद्यालयाच्या (HPT College) स्थापनेचा इतिहास उलगडला. ६० हजार लोकांकडून टी. ए कुलकर्णी यांनी चार चार आणे वर्गणी काढून १५ हजार रुपयांत जंगल असलेली जागा घेऊन महाविद्यालय सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. अनेक अडचणींवर मात करुन हे महाविद्यालय (College) उभे राहिल्याचे त्यांनी नमूद केले. सोसायटीच्या प्रांगणात लवकरच शंभर खाटांचे रुग्णालय (Hospital) उभे राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेलेले लेखक आणि प्रबोधनकार डॉ. उल्हास रत्नपारखी (Dr. Ulhas Ratnaparkhi) यांनी कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर यांच्यातील संबंध उलगडला. कुसुमाग्रजांचा विशाखा काव्यसंग्रह कानेटकर शिकवत असत. त्यांना सर्व कविता मुखोद्गत होत्या. विशाखाचे सर्वप्रथम वाचन कानेटकरांनी केले होते.

त्यांच्यावर वि. स. खांडेकर यांचा प्रभाव होता. विशाखा काढण्यासाठी कुसुमाग्रजांनी खांजेकरांना लवकर संमती दिली नव्हती. मात्र, खांडेकरांनी काम आधीच हाती घेऊन कानेटकरांना कवितांचे मुद्रितोधन करण्यास सांगितले होते, असे डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले. मराठी (Marathi) आणि इंग्रजी (English) अशा दोन्ही विषयांचे अध्यापन करताना त्यांनी कधीही पुस्तक हाती घेतले नाही, असे सांगत त्यांनी कानेटकरांना प्राध्यापक म्हणून उपस्थितांसमोर सादर केले.

लेखनासाठी वाचन, चिंतन, मनन

कानेटकर लेखन करण्यासाठी सतत वाचन, चिंतन, मनन केले, असे त्यांच्या स्नुषा श्रीमती अंजली कानेटकर (Anjali Kanetkar) यांनी सांगताना त्यांना झोपून लिहिण्याची सवय असल्याचे नमूद केले. त्यांची नाटके देशविदेशात जात असून, भाषांतराचे काम सुरू आहे. नवीन पिढीवर त्यांची नाटके प्रभाव पाडत असल्याचेही त्या म्हणाल्या.

एकांतवास भंग केला!

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे (Dr. Deepti Deshpande) लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. कानेटकरांना एकांतात राहणे आवडायचे पण त्यांच्या बंगल्यासमोर चिंचेचे झाड असल्याने चिंचा पाडण्यासाठी दगड मारुन कानेटकरांचा एकांतवास भंग केल्याची आठवण डॉ. देशपांडे यांनी सांगितली.

नंतर त्यांच्या घरी हक्काने येणेजाणे सुरू झाले तेव्हा त्यांच्या पत्नी सिंधूताईंनी घरातल्यासारखी वागणूक दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. कानेटकरांच्या विद्यार्थिनी हिरा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना गोखले एज्युकेशन सोसायटीशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. चित्रकार धनंजय गोवर्धने (Dhananjay Govardhane) यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी (Dr. V. N. Suryavanshi) महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवाची पार्श्वभूमी विशद करुन मान्यवरांचा परिचय करुन दिला. स्वागत व सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रणव रत्नपारखी यांनी केले.

याप्रसंगी सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, विश्वस्त आर. पी. देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, कल्पेश गोसावी आदी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात एचपीटी महाविद्यालयाचा इतिहास आणि कानेटकरांच्या नाटकांचा उल्लेख झाला.

श्रुतिका पाठक हिने मत्स्यगंधा नाटकातील 'तू तर चाफेकळी' हे गीत सादर केले. शुभम धांडे याने वेड्याचे घर या नाटकांतील प्रवेश सादर करताना दामूची व्यथा मांडली. कानेटकरांचे नातू अंशुमान, वासुदेव दशपुत्रे, शृजा प्रभूदेसाई, प्रतिमा कुलकर्णी आदींची मनोगते सादर करण्यात आली, तर वृन्दा भार्गवे आणि मार्मिक गोडसे यांनी चित्रफितीतून कानेटकर यांचा नाट्य, कथा, कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडला.

यानिमित्त माजी विद्यार्थी हिरा कुलकर्णी, धनंजय गोवर्धने, कवी नरेश महाजन, डॉ. उध्दव अष्टूरकर, पत्रकार प्रशांत भरवीरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वेड्याचे घर उन्हात, हिमालयाची सावली, अश्रूंची झाली फुले, येथे ओशाळला मृत्यू, वादळ माणसाळतंय आदी नाटकांचा उल्लेख झाला.

Related Stories

No stories found.