नाशिक | Nashik

कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीत शनिवारी (दि.१६) पहाटेच्या सुमारास कत्तल केलेल्या वृक्षास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

अशाप्रकारे गांधीगिरी आंदोलनातून या वृक्षतोडीचा निषेध करण्यात आला.

शनिवारी पहाटे काही संशयित दुचाकीवरून आले. त्यातील एकाने ट्री-कटिंग मशीन चालवत क्षणार्धात वृक्षाची कत्तल केली. वृक्ष रस्त्यावर कोसळला आणि संशयितांनी धूम ठोकली.

साधी फांदीसुद्धा न उचलता हे संशयित पसार झाल्यामुळे हा वृक्ष तोडण्यामागे काय उद्देश होता, असा सवाल उपस्थित हाेत आहे. वृक्ष कत्तलीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर दुपारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी वृक्ष रस्त्यातून बाजूला करत लाकूड जप्त केले.

याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद झाला असला तरी निःपक्षपातीपणे तपास करून संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दुचाकी क्रमांकावरून संशयित आणि त्यांना हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्यांचा शोध तातडीने न घेतल्यास यापुढे 'प्रहार' स्टाइलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, नितीन गवळी आदी उपस्थित होते.

उद्यान विभागाचे पाठबळ

उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे वृक्षतोडीला शंभर टक्के पाठबळ आहे. वृक्षतोड म्हणजे एकप्रकारे हत्याच असून, त्यामुळे यातील संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

- अनिल भडांगे, जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष