काठेवाडी जनावरांचा राजस्थान ते गोदाकाठ प्रवास

काठेवाडी जनावरांचा राजस्थान ते गोदाकाठ प्रवास

निफाड। प्रतिनिधी | Niphad

दुभत्या जनावरांच्या चारा, पाण्याची सोय व्हावी यासाठी राजस्थानमधून (rajasthan) गेल्या चार-पाच वर्षात गोदाकाठ परिसरात काठेवाडी जनावरे (Godavari river area) मोठ्या प्रमाणात डेरे दाखल होत असून या पशुपालकांनी विविध गावाच्या कडेला आपला मुक्काम ठोकला आहे. यातील अनेक परप्रांतीय नागरिक गोदाकाठच्या अनेक गावात मतदार (voter) देखील झाले आहेत. आपल्या मधाळ वाणीने या नागरिकांनी स्थानिक रहिवाशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आहेत.

तालुक्याच्या गोदाकाठ परिसरात मुबलक पाणी (water), ऊसाचे (sugarcane) क्षेत्र याबरोबर पाटबंधारे वनविभाग (Irrigation Forest Department) यांचे मोठ्या प्रमाणात पडीत क्षेत्र असल्याने काठेवाडी (kathiyawadi) जनावरांना चरण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे. त्यातच नदीकाठची ओसाड जमिन यामुळे भर दुपारी ही जनावरे नदीपात्रात मनसोक्त विहार करतांना दिसत आहेत. साधारणपणे दिवाळी (diwali) ते मे पर्यंत या परिसरात ऊसतोडणी हंगाम सुरू असल्याने ऊसाची बांडी, ऊसाचे तुकडे यावर या जनावरांची गुजराण चालते तर कांदा (onion) काढणीचे वेळेस कांदा पात तर इतरवेळी नदीकाठचे गवत याबरोबरच पशुखाद्य वापरून हे पशुपालक जनावरांची भुख भागवितात.

दुग्ध व्यवसायातून (Dairy business) मिळणारी रक्कम बाजूला ठेवून जनावरांपासून मिळणारे शेणखत अन् शेतकर्‍याच्या (farmers) शेतात जनावरे सोडल्याने असे शेतकरी या पशुपालकांना ठराविक रक्कम देतात. कारण शेतात जनावरे सोडल्याने त्याचे पडणारे शेणखत, गोमुत्र जमिनीची सुपिकता वाढविण्यास मदत करते. तर गावात असणार्‍या यात्रा, जयंती उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांना हे पशुपालक आर्थिक रूपाने मदत करतात. राजस्थानमध्ये चारा-पाण्याची टंचाई (Fodder-water scarcity) असल्याने हे पशुपालक आपल्या मुलाबाळांसह इकडेच स्थायिक होतात.

आपल्या मुला-मुलींचे विवाह देखील याच परिसरात साजरे करतात. दुग्ध वाहण्यासाठी पिकअप, टेम्पो, मोटारसायकल अशी साधने त्यांचेकडे असतात. पिण्यासाठी अन् जनावरांसाठी पाणी कोठे उपलब्ध आहेत अशी जागा शोधून हे व्यवसायिक आपला डेरा टाकतात. साहजिक तालुक्याच्या गोदाकाठ भागातील सायखेडा, सोनगाव, शिंगवे, करंजगाव, चितेगाव फाटा, खानगाव थडी, म्हाळसाकोरे, नांदूरमध्यमेश्वर, दिंडोरी, तारूखेडले, तामसवाडी, चापडगाव, कोठुरे, गोंडेगाव, चांदोरी, शिवरे आदी गावांच्या परिसरात हे काठेवाडी पशुपालक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याचे दिसून येतात.

सकाळ-सायंकाळ या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात दुध मिळत असल्याने या दुधाच्या भरवशावरच या परिसरात दुध डेअरी व्यवसाय बहरला आहे. तर याच काठेवाड जनावरांमुळे शेतकर्‍यांना गावातच शेणखत उपलब्ध होऊ लागले आहे. कारण द्राक्षबागांसह कांदा, ऊस, टोमॅटो आदी नगदी पिकांसाठी शेणखत जरुरीचे असते. त्यातच गोदाकाठच्या प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात काठेवाडी कुटुंबे डेरेदाखल झाल्याने या गावातील व्यवसायिकांची आर्थिक उलाढाल वाढली आहेत.

साधारणपणे एका गावात सात ते आठ कुटुंबे आपल्या जनावरांसह डेरेदाखल झाली असून गेल्या अनेक वर्षापासून ते याच परिसरात वास्तव्यास असल्याने व यातील अनेक नागरिक ग्रामपंचायतीचे मतदार झाले तर अनेकांनी येथे घरे बांधली आहेत. मुबलक पाणी, चारा अन् निवार्‍याची सोय यामुळे राजस्थानमधून आलेले हे पशुपालक आता गोदाकाठचेच रहिवाशी बनले आहेत. आपले काम अन् आपण यामुळे ते इतर भानगडीत पडत नसल्याने व ग्रामस्थांना देखील त्यांचा त्रास नसल्याने दिवसभर शिवारात जनावरांबरोबर भटकंती करणारे हे नागरिक सायंकाळ आणि सकाळ दुध धंद्यात व्यस्त असतात. त्यामुळे आपल्याच कामात रममाण असणार्‍या या नागरिकांना आता गोदाकाठची गोडी लागली आहे.

Related Stories

No stories found.