ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून काळया फिती बांधून कामकाज
नाशिक

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून काळया फिती बांधून कामकाज

डिझेल दरवाढीचा निषेध

Abhay Puntambekar

नाशिक। प्रतिनिधी

देशात आणि राज्यात करोनाच्या संकटाचा सामना करत असतांना उद्योग, व्यवसाय व सामान्य नागरिकांचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीत डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत असून डिझेल दरवाढीने ऐतिहासिक उंची गाठली आहे. याचा सर्वात मोठा फटका संपूर्ण देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसत असल्याने आज नाशिक मधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून काळ्या फिती बांधून कामकाज करत शासनाच्या डिझेल दरवाढ धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला.

सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीचा परिणाम अर्थचक्रावर होत असून संकटात सापडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायाला दिलासा देण्यासाठी डिझेलच्या दरात कपात करण्यात यावी यासाठी नाशिक ट्रान्स्पोर्ट व नाशिक गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व रस्ते वाहतूक मंत्री यांना निवेदन देऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. यावर निर्णय न झाल्यास १ जुलै रोजी प्रथमतः काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार कुठलाही निर्णय अद्याप झाला नसल्याने डिझेल दरवाढीच्या शासनाच्या धोरणाविषयी आज नाशिक मधील सर्व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी काळ्या फीत बांधून निषेध व्यक्त केला. तसेच जर शासनाने डिझेल दरवाढ मागे घेतली नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सातत्याने डिझेलमध्ये दरवाढ होत असल्याने वाहतूक खर्च अधिक वाढत आहे. त्याचा वस्तूच्या किमतीवर होत असून महागाई अधिक वाढून नागरिक देखील अडचणीत येणार आहे. एकतर अगोदरच कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून त्यात महागाईची झळ बसल्यास उद्योग व्यवसाया सोबतच नागरिकांच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे शासनाने तातडीने डिझेल दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी ट्रान्सपोर्ट संघटनांकडून करण्यात आलेली आहे.

यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा,राजेश सिंगल,संजय राठी,शंकर धनावडे,सतीश कलंत्री, महेंद्रसिंग राजपूत,सुनील ढाने, रोहित सुराणा,सुलेमान सय्यद,तेजपाल सोडा,दलजीत मेहता, सिद्धेश्वर साळुंके,बजरंग शर्मा, आडगाव नाका ट्रक टर्मिनल, शिंदे पळसे, सिन्नर, सातपूर, अंबड, द्वारका या परिसरात आपापल्या कार्यालयात निषेध व्यक्त केला.

बऱ्याच वेळा आम्ही कळविले आहे की वाहतूक दारांचे व कारखान्यांचे,इतर माल वाहतूक कंत्राट हे वार्षिक केलेले असते त्या साठी तीन ते चार महिन्यात नियोजित दर वाढ असेल तर आगोदर आम्हाला कारखान्यांना कंत्राट नियम अटी मध्ये टाकता येते परंतु रोजच दरवाढ होत असेल तर ते त्वरित थांबवावे अशी आमची मागणी आहे. जर शासनाने ही दरवाढ मागे घेतली नाही तर प्रसंगी आंदोलनाशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेल्या नाही.

राजेंद्र फड, अध्यक्ष नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक.

देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असतांना दिवसेंदिवस त्या अडचणी कमी होण्यापेक्षा त्या वाढतच चालल्या आहे. मात्र शासनाला याबाबत कुठलही सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अडीअडचणी बाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा होऊन देखील शासन जर त्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर वाहतुकदारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय खुला राहिलेला नाही.

पी.एम.सैनी, अध्यक्ष नाशिक गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com