रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक; दोघांना अटक

रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक; दोघांना अटक

संगमनेर । प्रतिनिधी

रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतले असून जवळपास पाच खोके देशी बनावटीच्या दारुसह 2 लाख 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली. मात्र दूरवरुन सायरनचा आवाज आला नाही, सदरचे वाहन दृष्टीपथात येताच सायरन का वाजला? असा प्रश्न यावेळी तपासणी नाक्यावर उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पडला.

आपण पकडले जातो की काय या भितीने चालकाने नाक्यापासून काही अंतरावर पुढे जात नवीन नगर रस्त्यावर आपली रुग्णवाहिका उभी केली व तो पोलिसांकडे चालत गेला. यावेळी पोलिसांनी रुग्ण नसतांना सायरन का वाजवतोय? असा सवाल केल्यानंतर तो काहीसा गोंधळला आणि येथेच पो.नि.देशमुख यांनी त्याला हेरला.

त्याच्या रुग्णवाहिकेची तपासणी करण्याचा आदेश मिळताच नाक्यावरील चौघांनी त्या वाहनाकडे धाव घेत त्याचा दरवाजा उघडताच पोलिसांनीही तोंडात बोट घातले. मारुती ओमनी कंपनीच्या या वाहनात ज्या ठिकाणी रुग्ण ठेवला जातो त्या संपूर्ण भागात पद्धतशीरपणे थोडी ना थिडकी तब्बल पाच खोके देशी दारु पोलिसांना आढळली.

यावेळी सदरच्या रुग्णवाहिकेतून तब्बल 23 हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची दारु जप्त करीत पोलिसांनी चालक विजय खंडू फड (वय 42, रा.साईदर्शन कॉलनी, मालदाड रोड) व त्याचा साथीदार कैलास छबुराव नागरे (वय 49, रा.शेडगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरची देशीदारु शेडगाव येथे घेवून जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com