
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जि.प.च्या 1653 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांना 31 मे रोजी नवीन शाळेत रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येणार आहे. परंतु, 277 शिक्षकांनी विविध कारणे देत योग्य ठिकाणी बदलीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. यात सुरगाण्यात बदली झालेल्या 10 द्विशिक्षकी शाळेतील 20 शिक्षकांचा समावेश आहे.
विविध कारणे देत सोयीच्या ठिकाणी बदली न झाल्याने शिक्षकांत नाराजी आहे. सुरगाण्याचाच विचार केला तर 10 द्विशिक्षकी शाळांतील 20 शिक्षकांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या. मात्र, या शाळांत शिक्षक यायला तयार नाहीत. त्यांनी याचिका दाखलची परिपूर्ण तयारी केली आहे. तालुक्यातील उंबरठाणमधील चुली, जाहुलेमधील टापूपाडा व सुकतळे, माळेगावमधील पाथर्डी, मांगदे ग्रामपंचायतमधील मास्तेमाणी, करंजूल (सु) ग्रामपंचायतमधील बोरीचा गावठा, खुंटविहीरमधील मोहपाडा, मांदा ग्रामपंचायतमधील देशमुखपाडा व पाथरपाडा अशा 10 दुर्गम गावात शिक्षक यायला तयार नाही. या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना स्वत:च्या गावात योग्यप्रकारचे प्राथमिक शिक्षण मिळणे मुश्कील होणार आहे.
तालुकानिहाय बदली झालेले शिक्षक
नाशिक : 44, बागलाण : 86, चांदवड : 126, देवळा : 52, दिंडोरी : 121, इगतपुरी : 134, कळवण : 135, मालेगाव : 115, नांदगाव : 111, निफाड : 122, पेठ : 119, सिन्नर : 112, सुरगाणा : 126, त्र्यंबकेश्वर : 101, येवला : 135