जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्यांना अखेर ब्रेक

जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्यांना अखेर ब्रेक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी भागातील समतोल साधला जाणार नसल्याचे सांगत विभागप्रमुखांनी बदल्यांना नकार दाखविल्याने अखेर जिल्हा परिषद( Nashik Zilla Parishad ) सेवकांच्या बदल्यांना ( Transfer ) ब्रेक लागला आहे. पदाधिकार्‍यांनाही सेवक बदल्या नकोच होत्या. त्यामुळे त्यांच्याही मनासारखे झाले आहे. मात्र, बदली प्रक्रिया होणार नसल्याने सेवा ज्येष्ठता असलेल्या सेवकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.जिल्हा परिषदेतील बदल्यांचा घोळ गेल्या चार दिवसांपासून सुरू होता. तो अखेर मिटला असून सेवक बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

बदली प्रक्रियेत आदिवासी व बिगरआदिवासी भागातील समतोल साधला जाणार नसल्याने विभागप्रमुखांनी बदल्यांना नकार दर्शवत अहवाल सादर केले होते. त्यानुसार पदाधिकार्‍यांनीही बदल्या नको, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे प्रशासनाने ग्रामविकास विभागाला पत्र देत जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार करता समतोल साधणे शक्य नसल्याने आदिवासी व बिगरआदिवासी भागातील रिक्त पदांच्या प्रमाणात समतोल राखून बदली प्रक्रिया करण्याची विनंती केली आहे.

ग्रामविकास विभागाने सेवक बदली प्रक्रियेबाबत 10 टक्के प्रशासकीय व 10 टक्के विनंती बदली प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. 31 जुलै 2021 अखेर प्रशासकीय बदल्या कराव्यात, तर 14 ऑगस्टपर्यंत विनंती बदल्या करण्याचे निर्देश दिलेले होते. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागात केवळ 5 टक्के सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. बदली प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाकडून सेवकांची अंतिम यादी तयार करण्यात आली होती.

तसेच 27 ते 29 जुलैदरम्यान ही प्रक्रिया राबवण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत धोरण निश्चित होईना. त्यातच या बदली प्रक्रियेत आदिवासी भागातील रिक्त जागा भरल्या जातील. त्यामुळे बिगरआदिवासी भागातील रिक्त जागांची संख्या वाढण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.

बिगरआदिवासी भागात निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. या बदल्या झाल्या तर या रिक्त जागांची संख्या वाढणार असल्यामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत बदल्या नको, अशी भूमिका खातेप्रमुखांसह पदाधिकार्‍यांनी घेतली होती.

ग्रामविकास विभागाला पत्र

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागनिहाय आदिवासी, बिगर आदिवासी रिक्त जागांचा अहवाल मागविला होता. या अहवालानुसार 1681 पदे रिक्त असल्याने अन् बदली प्रक्रिया राबविल्यास आदिवासी व बिगर आदिवासी भागात असमतोल होऊन रिक्त पदांची संख्या वाढेल, असे पत्र ग्रामविकास विभागाला देत, रिक्त पदाच्या प्रमाणात समतोल राखून बदली प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com