अखेर जि.प.सेवकांच्या बदल्या रद्द
नाशिक

अखेर जि.प.सेवकांच्या बदल्या रद्द

केवळ आपसी, विनंती बदल्याच होणार

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात रद्द करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सेवकांच्या बदल्या कराव्यात की नाही ? याबाबत संभ्रमात असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने सेवक बदली प्रक्रीया न राबविण्याचा निर्णय बुधवारी (दि.५) उशीरा घेतल्याचे समजते.

दरम्यान,बदली प्रक्रीया रद्द करतांना सेवकांवर अन्याय होऊ नये यासाठी केवळ आपसी तसेच विनंती बदल्याच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्य सरकारने जि.प.सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश देत ही प्रक्रीया ३१ जुलैपर्यंत पार पडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जि.प. प्रशासनाने तयारी करत सेवा ज्येष्ठता यादी तयार करून २३ जुलै रोजी प्रसिध्द करत आॅनलाईन बदली प्रक्रीया राबविण्याची तयारी केली. यातच या बदल्यांना १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ आली. प्रशासन बदली प्रक्रीया राबविण्याच्या तयारीत असताना बदल्या करू नये, अशी मागणी झाली.

अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया राबवू नये असे सांगितले. बदली प्रक्रिया राबविल्यास बिगर आदिवासीमधील रिक्त जागांची संख्या वाढणार असल्याची भिती व्यक्त केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विभागप्रमुखांची बैठक घेत, आढावा घेतला.

या बैठकीत बहुतांश अधिकाऱ्यांनी कोविडच्या पार्श्वभूमिवर बदल्या नकोच असा सूर लावला. यात बनसोड यांनी बदली प्रक्रीया झाल्यास रिक्त जागांचा अहवाला मागविला. त्यामुळे बदल्या होणार की नाही. याबाबतचा संभ्रम वाढत चालला होता. बुधवारी प्रशासनाने सेवक बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेड व जालना जिल्हा परिषदेनेही सेवक बदली प्रक्रीया न राबविण्याचा निर्णय यापूर्वी घेतलेला आहे. याच धर्तीवर बदली प्रक्रीया न राबविण्याचा निर्णय नाशिक जिल्हा परिषदेने घेतला आहे.

वित्त व ग्रामपंचायतीतील बदल्या कराव्या

कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर सेवकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी, लेखा व वित्त आणि ग्रामपंचायत विभागातील बदल्या कराव्यात, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी केली आहे. लेखा व वित्त विभागात अनेक सेवक वर्षोनुवर्ष एकाच टेबलावर असल्याने त्यांची मोनोपॉली तयार झाली असून अनेक सेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्या बदल्या कराव्यात. याशिवाय ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवकांच्या तक्रारी मोठया प्रमाणावर असल्याने या बदल्या कराव्यात, अशी मागणी सभापती संजय बनकर, सदस्य मनिषा पवार, सिध्दार्थ वनारसे, सविता पवार, यतिन कदम, कावजी ठाकरे आदींनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com