जि.प.लेखा-वित्त विभागातील 
अतंर्गत सेवकांच्या बदल्या
नाशिक

जि.प.लेखा-वित्त विभागातील अतंर्गत सेवकांच्या बदल्या

Vijay Gite

Vijay Gite
नाशिक । Nashik
जिल्हा परिषदेतील मुख्यालयातील अतंर्गत बदल्यांना अखेर मुहुर्त सापडला असून, लेखा व वित्त विभागातील अतंर्गत सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. वर्षोनुवर्ष एकाच टेबलावर असलेल्या अन तक्रारी असलेल्या सेवकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांचे पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी स्वागत केले आहे.


लेखा व वित्त विभागातील अतंर्गत बदल्या झाल्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागातील अतंर्गत बदल्यांची प्रतिक्षा लागली आहे. या विभागातील सेवकांच्या मोठया तक्रारी असल्याने त्यांच्या बदल्यांच्या मागणीचे पत्र सदस्यांनी दिलेले आहे. त्यामुळे या बदल्याही लवकर करण्याची मागणी होत आहे.


जि.प. लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून विभागाला शिस्त आणण्याचे काम केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले. मात्र, त्यांच्या विभागातील सेवकांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी होत्या. विभागात ठराविक टेबलावर वर्षोनुवर्ष ठाण मांडून असलेल्या सेवकांकडून फाईलीची अडवणूक, ठराविक फाईलींना प्राधान्य देणे यासारखे प्रकार सुरू होते. वर्षोनुवर्ष एकाच टेबलावर असल्याने त्यांची मोनोपॉली तयार झाल्याने त्यांच्या कामकाजाचा फटका पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना बसत होता.

यावर, माजी सभापती यतिंद्र पगार, कावजी ठाकरे, सिध्दार्थ वनारसे आदींनी तक्रारी करत अतंर्गत बदल्यांची मागणी केली होती. मात्र, या बदल्यांना सतत अडचण येत होती. अखेर गुरूवारी लेखा व वित्त अधिकारी बच्छाव यांनी अतंर्गत विनंती बदल्या केल्या.


यात कनिष्ठ लेखाधिकारी राजेश ठाकूर यांची वित्त विभागातून ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बदली झाली आहे. वित्तच्या वरिष्ठ सहाय्यक अनुपमा घोलप यांची कृषी विभागात, लेखाचे वरिष्ठ सहाय्यक चंद्रशेखर गवळी यांची शिक्षण विभागात, लेखाचे कनिष्ठ सहाय्यक रविंद्र चंद्रात्रे यांची कृषी तर लेखाचे कनिष्ठ सहाय्यक रेखा चव्हाण यांची सामान्य प्रशासन विभागात बदली झाली आहे. या बदल्या झाल्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागातील अतंर्गत बदल्यांकडे लक्ष लागले आहे.

या विभागातील सेवकांबाबतही मोठया तक्रारी असल्याने अतंर्गत बदल्या करण्याची मागणी सभापती संजय बनकर, भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, सदस्य सिध्दार्थ वनारसे, सविता पवार, मनिषा पवार या सदस्यांनी केली असून पत्रही देण्यात आले आहे. त्यामुळे या विभागातीलही बदल्या लवकर कराव्यात, अशी मागणी सदस्यांकडून होऊ लागली आहे.

बांधकामची धुरा हळदेंकडे
बांधकाम विभागातील वादग्रस्त सहाय्यक लेखाधिकारी ज्ञानेश्वर लाड यांचे निलंबन केल्यानंतर त्यांचा पदभार समाजकल्याणचे सहाय्यक लेखाधिकारी हरिश विसपुते यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, विसपुते यांना विनंती बदलीची मागणी केली होती.

त्यानुसार विसपुते यांचा पदभार काढून घेत या पदावर रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी विजयकुमार हळदे यांची बदली करण्यात आली आहे. हळदे यांना कामाचा दांडगा अनुभव असल्याने बांधकामला शिस्त लागेल,असे बोलले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेल्या या बदलीचे पदाधिकाऱ्यांसह सदस्य, ठेकेदारांनी स्वागत केले आहे.


लेखा व वित्त विभागातील बदल्या केल्यानंतर सामान्य प्रशासनातील अतंर्गत बदल्यांची कार्यवाही तात्काळ करावी. येथील सेवकांच्या तक्रारी आहे. वेळेवर कार्यवाही न झाल्यास स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला जाईल.
- डॉ. आत्माराम कुंभार्डे (गटनेता, भाजप)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com