
पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Plakhed Mirchiche
वर्षानुवर्ष बंद स्थितीत असलेला निफाड सहकारी साखर कारखाना (Niphad Cooperative Sugar Factory) भाडेतत्वावर चालविण्यास देण्याच्या निविदा प्रक्रियेत (tender process) दोन महिन्यांपूर्वी नाशिक (Nashik) येथील बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी अव्वल आली होती.
दरम्यानच्या काळात कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nashik District Central Cooperative Bank) आणि बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात भाडे करारनामा (rental agreement) झाला. जिल्हा बॅक प्रशासनाने निफाड सहकारी साखर कारखाना बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण केला असून उद्यापासून कारखान्याच्या मेंटेनन्सला सुरुवात होणार असल्याची माहिती बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशासनाने दिली आहे.
निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून गेल्या 15 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने गेल्या दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता. तेव्हापासून साखर कारखाना बंद अवस्थेत होता. कारखाना सुरू व्हावा यासाठी काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून प्रयत्न सुरू होते. कारखाना सुरू व्हावा यासाठी ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकर्यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही (agitation) झालेली आहेत. परंतु बँकेचे कर्ज असल्याने कारखाना सुरू होण्यास अनेक अडथळे येत होते.
राजकीय पक्षांचे (Political parties) पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या तगाद्यामुळे जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. बँक प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी या विषयीची जाहिरात देत टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. पाच मक्तेदारांनी निविदा प्रक्रियेत (tender process) भाग घेतला होता. या प्रक्रियेत नाशिक शहरातील प्रसिद्ध बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनी निविदा प्रक्रियेत अव्वल आल्याने सदर निविदा मंजूर करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात जिल्हा बँक प्रशासन आणि बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीने कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत सोपस्कर पार पाडले. जिल्हा बँक प्रशासन आणि बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात आज पिंपळगाव येथील रजिस्टर कार्यालयात 25 वर्षांसाठी भाडेकरारनामा झाला. करारनामा पूर्ण होताच जिल्हा बँकेने निफाड कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हस्तांतरित केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), बी.टी. कडलग (B.T. Kadlag), जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे (District Bank Chief Executive Officer Shailesh Pingle), धनावटे आदी उपस्थित होते.
येत्या दोन दिवसात कारखान्यामधील यंत्रसामग्रीच्या मेंटेनन्सचे काम सुरू होणार असून मे महिन्याच्या आत पहिले गाळप घेण्याचा मानस कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. कारखाना आता सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.