मनमाड : करोना संकटकाळात  पालिका मुख्याधिकार्‍यांची बदली
नाशिक

मनमाड : करोना संकटकाळात पालिका मुख्याधिकार्‍यांची बदली

नव्या नियुक्तीची मागणी

Abhay Puntambekar

मनमाड । प्रतिनिधी Manmad

शहरात करोनाचा कहर सुरूच असून गेल्या काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या ११६ वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असतांनाच पालिका मुख्याधिकार्‍यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दुसर्‍या अधिकार्‍याची नियुक्ती देखील झाली नसल्यामुळे उपाययोजनांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे करोनाच्या संकटकाळात शहरातील सव्वालाख नागरिकांना शासन-प्रशासनाने वार्‍यावर सोडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

शहरात २ मेरोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होत बाधितांची संख्या ५४ पर्यंत गेली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर आरोग्य सेवकांनी विविध उपाययोजना केल्या. त्यांना लोकप्रतिनिधी व जनतेची पुरेपूर साथ मिळाली. त्यामुळे सुदैवाने शहरात करोना आटोक्यात येवून टप्प्याटप्प्याने रुग्णांनी करोनावर मात केली होती.

शेवटच्या २ रुग्णांनी देखील करोनाला पराजित केल्यानंतर दि. २६ जूनरोजी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थित या रुग्णांना पुष्पगुच्छ देवून निरोप देण्यात आला होता. शहर करोनामुक्त झाल्याचा आनंद नागरिक व्यक्त करीत असतांना अवघ्या काही तासात शहरात पुन्हा एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. त्यानंतर पुन्हा करोनाने शहरात कहर करण्यास सुरुवात केली. दररोज बाधित रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णांची संख्या ११६ वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोना आटोक्यात आणण्यासाठी वेगेवगळ्या उपाययोजना करण्याची नितांत गरज असतांना शासनाने पालिका मुख्याधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी तत्काळ नवीन अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची गरज असतांना तीन दिवसाचा कालावधी उलटून देखील अद्याप मुख्याधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे करोनाच्या संकट काळात शासन-प्रशासनाने शहरातील सव्वालाख जनतेला वार्‍यावर सोडल्याचे मत रिपाइं नगरसेवक गंगा त्रिभुवन यांनी व्यक्त केले. दरम्यान,व्यापारी महासंघ आयोजित ५ दिवसांच्या जनता कर्फ्युला आज तिसर्‍या दिवशीदेखील संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातील काही दुकाने बंद होती.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांचे चांगले काम सुरू होते. त्यांनी मध्यंतरी शहराला करोनामुक्त देखील केले होते. मात्र अचानक त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे पालिकेचे कामकाज रखडले असून करोना नियंत्रण कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मुख्याधिकारी लवकर नियुक्त करण्यात यावा.

गंगाभाऊ त्रिभुवन, रिपाइं नगरसेवक, मनमाड

Deshdoot
www.deshdoot.com