पोलीस ठाण्यातून होणार वाहतुक नियंत्रण

वाहतुक विभागाचे विकेंद्रीकरण
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

नाशिक । Nashik

शहरातील बिघडलेली वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहरात स्वतंत्रपणे कार्यरत असलेली वाहतुक शाखा विलीन करण्यात येणार असून आता पोलीस ठाणेनिहाय वाहतुक शाखेची कर्मचारी नियुक्त करून सबंधीत पोलीस ठाणीच त्यांच्या भागातील वाहतुक नियंत्रण करणार असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक शाखेची सध्या कार्यरत असलेली चार युनिट कार्यालये बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी घेतला आहे. पोलिस ठाणे निहाय वाहतूक विभागाचा विस्तार करण्यात येणार असून, 13 पोलिस ठाण्यांमध्ये वाहतूक शाखेचे प्रत्येकी एक युनिट सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक शाखेला पोलिस ठाणे निहाय वाहतूक नियोजन करणे सहज सोपे होणार असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील वाढती वाहन संख्या पाहता वाहतूक शाखेवर दि वसेंदिवस ताण वाढत आहे. यामुळे वाहतूक शाखेचे विक्रेंदीकरण करून या समस्या सोडवण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी जुने पोलिस आयुक्तालयातून केंद्रीय पद्धतीने सुरू असलेल्या वाहतूक शाखेचा कारभार चार युनिट्समध्ये विभागण्यात आला. तीन ते चार पोलिस ठाणे मिळून एक युनिट कार्यालय सुरू करण्यात आले होते.

यात सहायक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयांप्रमाणे या युनिट्सला पोलिस ठाणे जोडण्यात आली होती. मात्र, एका युनिट्सच्या माध्यमातून तीन पोलिस ठाणे हद्दीत वाहतुकीचे नियोजन करणे ही देखील तापदायक बाब ठरली. यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी चार युनिट्स बंद करून त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

या विक्रेंदीकरणाच्या फायद्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, चार युनिटच्या माध्यमातून काम करताना अनेक भागाकडे दुर्लक्ष होत होते. आता पोलिस ठाण्यानिहाय वाहतुक विभागाचेही 13 युनिट्स सुरू होणार असल्याने त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुक प्रश्न तात्काळ सोडवणे शक्य होणार आहे.

अस्तित्व वेगळेच

त्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाचे रस्त्यावरील अडचणी, वाहतूक कोंडी असे प्रश्न मर्यादीत स्वरूपात राहतील. जवळच कर्मचारी उपलब्ध असल्याने तात्काळ अडचणी सोडवणे शक्य होईल. पोलिस ठाण्यांमधूनच वाहतूक कार्यालयांचा कारभार चालेल. मात्र, त्याचे अस्तित्व वेगळे राहणार आहे.

- पौर्णिमा चौघुले-श्रींगी, पोलीस उपायुक्त, वाहतुक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com