नाशिक । प्रतिनिधी

पंचवटी विभागातील प्रभाग दोन मधील आडगांव शिवारात असलेल्या हॉटेल जत्रासमोर, कोणार्कनगर परिसर भरणारे भाजीबाजार हे परिसरातील नागरिकांना असुन अडचण नसुन खोळंबा ठरले आहे.

याठिकाणी थेट महामार्गावरील वाहतुक कोंडीत भर पडत आहे. कोणार्कनगर भागात परवानगी नसतांना आठवड्यात दोनदा आणि दररोज सायंकाळी बाजार भरत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. या सर्व प्रकाराकडे महापालिका अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने परिसरात अतिक्रमणात भर पडत आहे.

नाशिक शहरातील पंचवटी विभागातील महामार्गालगत असलेल्या हॉटेल जत्रासमोर सर्व्हिेस रोडवर व परिसरात दर गुरुवारी सकाळी भाजीबाजार भरत असल्याने महामार्गावरील वाहतुक कोंडीत भर पडत आहे. परिसरातील शेतकरी, भाजी विक्रेते यांची संख्या मोठी असल्याने भाजी विक्रेत्यांची मोठी अडचण परिसरातील वाहन धारकांना होत आहे. तसेच या चौफुलीवर पायी रस्ता ओलांडणे अवघड बनलेले आहे.

याभागात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतुक ही सर्व्हिस रोडने वळविण्यात आली असुन यालगत भाजीबाजार भरत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला जात आहे. तसेच याठिकाणी चौकात मोठया प्रमाणात हातगाड्या लावण्यात आलेल्या असुन याठिकाणी पायी चालणे अवघड बनत आहे. अशाप्रकारे बेशिस्तीत भरणार्या भाजीबाजाराला शिस्त लावण्याचे काम अतिक्रमण विभागाकडुन होत नाही. तसेच याच भागातील कोणार्कनगर भागात आठवड्यात दोनदा भरणारा भाजीबाजार नागरिकांची डोके दुखी बनला आहे. मंगळवार व शुक्रवारी भरणारा भाजीबाजार गणेश मार्केट ते जत्रा - नांदूर लिंकरोडपर्यत भरत असल्याने कोणार्कनगर परिसर व लिंकरोड अशा भागातील वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे.

याभागात दोनदा भाजीबाजार भरविण्यास परवागी नसतांना बाजार भरत असतांनाच आता दररोज सायंकाळी श्रीराम नगर ते कोणार्कनगर याठिकाणी भाजीबाजार भरत असल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सुरू झाला आहे. दोनदा आठवडा भाजार आणि दररोज सायंकाळच्या बाजारामुळे चार चाकी व दुचाकी घेऊन जाणे अवघड बनसले असुन दररोज वाहतुक कोंडीचा मोठा मनस्ताप स्थानिक नागरिकांना होत आहे. तसेच याभागातील नागरिक व दुकानदारांना देखील भाजीबाजाराचा मोठा त्रास होत आहे.

याठिकाणी बसणारे विक्रेत्यांची मोठी मुजोरी याठिकाणी नागरिकांना सहन करावी लागत असुन याचा प्रत्यय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला आला आहे. दीड दोन महिन्यापुर्वी याठिकाणी भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागावर हल्ला केला होता. असे असतांना अतिक्रमण विभागाकडुन या दररोजच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे आयुक्तांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमण व भाजीबाजारामुळे नागरिक त्रस्त

हॉटेल जत्रासमोर भरणार्या भाजीबाजारामुळे थेट महामार्गावरील वाहतुक विस्कळीत होते. तसेच यामुळे नागरिकांनी महामार्ग ओलांडणे कठीण होऊन जीव मुठीत धरुन जावे लागते. अधिकार्यांनी समक्ष पाहणी करुन कारवाई करावी. हा प्रकार टाळण्यास भाजीबाजाराची जागा बदलावी.

राजु लभडे, स्थानिक रहिवासी.

शहरात सर्वत्र एकदा भाजीबाजार भरत असतांना कोणार्कनगर भागात दोन भाजीबाजारास कोणी परवानगी दिली ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासुन याठिकाणी दररोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यत भाजीबाजार बसत असल्याने याभागातील नागरिकांनी मोठा मनस्ताप होत आहे. आपली वाहने घरापर्यत नेण्यासाठी मोठा त्रास सुरू आहे. याठिकाणी अतिक्रमण विभागची काही लोक घेऊन हप्ते घेत असल्याची चर्चा याभागात आहे.

राजेंद्र जाधव, श्रीरामनगर.